मुंबई : भावी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राजभवनावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे यादेखील उपस्थित होत्या. शपथविधीची माहिती देण्यासाठी ते राजभवानत दाखल झालेत. उद्या संध्याकाळी ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. विधीमंडळ राजकारणात उद्धव ठाकरेंचे पहिले पाऊल आहे. उद्धव ठाकरे हे शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या पक्षांच्या महाराष्ट्र आघाडीचे नेता म्हणून निवडले गेले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकिकडे आमदारांचा शपतविधी सोहळा विधिमंडळात सुरु असताना शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या महाराष्ट्र आघाडीचे नेते उद्धव ठाकरे हे विधिमंडळात न येता ते थेट राजभवनात गेलेत.  उद्या संध्याकाळी दादर शिवाजी पार्क अर्था शिवसेनेच्या शिवतीर्थावर ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यापूर्वी आज ते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी राजभवनाकडे रवाना झाले होते.



दरम्यान, आमदारांच्या शपथविधीनंतर महाविकासआघाडीतील खातेवाटपाबद्दल चर्चा होण्याची शक्यता असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दिली. त्यामुळे कोणाची मंत्रीपदी निवड होणार याचीही उत्सुकता आहे.


शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि आमदारांची एक बैठक मंगळवारी संध्याकाळी हॉटेल ट्रायडंटमध्ये झाली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी महाराष्ट्र विकासआघाडीचे नेते म्हणून तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी अनुमोदन दिले. या ठरावाला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांच्या सर्व आमदारांनी एकमताने अनुमोदन दिले. यावेळी तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले.