मुंबई: पाकपुरस्कृत दहशतवाद्यांचा कश्मीरात नंगानाच सुरू आहे. त्याशिवाय तेथील हिंदुस्थान प्रेमाचा प्रत्येक आवाज बंद केला जात आहे. अशावेळी तुमचे आंतरराष्ट्रीय दौरे व राजकारण कुचकामी ठरते. सध्या तेच सुरू आहे, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावत काश्मीर प्रश्नावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. तसेच, 'कश्मीर प्रश्नाचा चुथडा जितका नेहरूंनी किंवा काँग्रेसने केला नसेल तितका सध्याच्या राज्यकर्त्यांनी केला आहे', असा हल्लाही ठाकरे यांनी विद्यमान सरकारवर केला आहे.


सरकार शिरकुर्म्याच्या ढेकरा देत जणू आडास तंगडय़ा लावून बसले आहे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'दै. सामना'मध्ये 'कश्मीरात नंगानाच!' या मथळ्याखाली उद्धव ठाकरे यांनी एक लेख लिहीला आहे. या लेखात काश्मीर प्रश्न, रमजान काळात सैन्याकडून राबवली जाणारी शस्त्रसंधी आणि सरकारची ध्येयधोरणे, पंतप्रधानांचे परदेश दौरे आदी गोष्टींवर समनातून जोरदार हल्ला करण्यात आला आहे. सरकारवर टीका करताना, 'देशाची सुरक्षा कश्मीर खोऱयात रोज रक्ताने न्हाऊन निघत आहे. रमजानचे रोजे पाळणारे आमचे सरकार शिरकुर्म्याच्या ढेकरा देत जणू आडास तंगडय़ा लावून बसले आहे. रमजान म्हणून आम्ही कश्मीरात एकतर्फी शस्त्रसंधी जाहीर केली. ती आमच्या सुरक्षा दलांना कसोशीने पाळायला लावली. मात्र त्याचा गैरफायदा घेत पाकपुरस्कृत दहशतवाद्यांचा कश्मीरात नंगानाच सुरू आहे. त्याशिवाय तेथील हिंदुस्थान प्रेमाचा प्रत्येक आवाज बंद केला जात आहे. अशावेळी तुमचे आंतरराष्ट्रीय दौरे व राजकारण कुचकामी ठरते. सध्या तेच सुरू आहे, असे सामनात म्हटले आहे.


देशांतर्गत सुरक्षेचा खेळखंडोबा


'हिंदुस्थान नामक देशातील अंतर्गत सुरक्षा म्हणजे एक खेळखंडोबाच झाला आहे. अयोध्येत श्रीरामाचे मंदिर उभे राहिलेले नाही. राम आजही वनवासात आहे, पण देशाची सुरक्षा मात्र ‘रामभरोसे’ पद्धतीने सुरू आहे. रमजानच्या महिन्यात कश्मीरात जो हिंसाचार, रक्तपात, हत्यासत्र अतिरेक्यांनी सुरू केले आहे त्याचे पाप सरकारच्या माथी मारावेच लागेल. आमच्या प्रिय मोदी सरकारने रमजानचे पावित्र्य वगैरे जपण्यासाठी कश्मीरात एकतर्फी युद्धबंदी जारी केली. पण त्याच वेळी सीमेपलीकडून व आतही पाकपुरस्कृत अतिरेक्यांचा रक्तपात थांबलेला नाही. म्हणजे रमजानचे पावित्र्य आम्ही जपायचे व पाकडय़ांनी मात्र आमच्या रक्ताने रमजानची इफ्तारी करायची, अशी भयंकर स्थिती सध्या कश्मीरमध्ये दिसत आहे. रमजान सुरू झाल्यापासून आजपर्यंत कश्मीरात १८ जवान शहीद झाले. त्यात गुरुवारी दहशतवाद्यांनी आमचा जाँबाज जवान औरंगजेबास पळवून नेले व त्याची निर्घृण हत्या केली. त्याशिवाय ‘रायझिंग कश्मीर’ या दैनिकाचे संपादक सुजात बुखारी यांचीदेखील हत्या केली. अशा या राष्ट्रभक्त बुखारींचे रक्षण आमचे सरकार करू शकले नाही, असे सामनातील लेखात ठाकरे यांनी म्हटले आहे.


पंतप्रधान परदेशवारीवर... संरक्षणमंत्री पक्षकार्यात 


पंतप्रधान परदेशवारीवर असतात व संरक्षणमंत्री पक्षकार्यात अडकून पडल्या. गृहमंत्री आहेत आणि नाहीत. पंतप्रधानांनी सतत परदेश दौरे करून हिंदुस्थानची मान जगात उंचावली आहे असे सांगितले जाते, पण ही मान मोडण्याचे काम संयुक्त राष्ट्राने केले. कश्मीरात मानवाधिकाराचे उल्लंघन होत असल्याचा फालतू अहवाल ‘युनो’ने प्रसिद्ध करून श्री. मोदी यांच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेचे लचके तोडले आहेत. याचा अर्थ असा की, असंख्य जागतिक वाऱया केल्यानंतरही कश्मीरप्रश्नी हिंदुस्थानच्या पाठीशी उभे राहायला कोणी तयार नाही व ‘युनो’त आमची बाजू नीट मांडली जात नाही. कश्मीर प्रश्नाचा चुथडा जितका नेहरूंनी किंवा काँग्रेसने केला नसेल तितका सध्याच्या राज्यकर्त्यांनी केला आहे, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.