मुंबई: मंत्रिपदाची संधी न दिल्यामुळे नाराज झालेल्या खासदार भावना गवळी यांची नाराजी लवकरच शिवसेनेकडून दूर केली जाण्याची शक्यता आहे. सलग पाचव्यांदा लोकसभेत निवडून जाऊनही संधी न मिळाल्याने भावना गवळी नाराज होत्या. मात्र, आता उपाध्यक्षपद देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती पुढे येत आहे. भावना गवळी यांच्याकडे गटनेतेपद सोपवले जाण्याचा विचार होता. परंतु, भावना गवळींनी हे पद गवळींनी नाकारले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, आता शिवसेनेकडून लोकसभेच्या उपाध्यक्षपदावर दावा करण्यात आला आहे. हा आमचा नैसर्गिक हक्क आहे. बऱ्याच काळापासून आमची ही मागणी प्रलंबित आहे. त्यामुळे आतातरी आम्हाला लोकसभेचे उपाध्यक्षपद मिळालेच पाहिजे, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले. 



भावना गवळी या लोकसभेतील शिवसेनेच्या सर्वात ज्येष्ठ खासदार आहेत. त्या सलग पाचवेळी लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीत त्यांनी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या माणिकराव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या प्रवीण पवार यांचा दणदणीत पराभव केला होता. त्यामुळे भावना गवळी यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. मात्र, 'मातोश्री'ने अरविंद सावंत यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ टाकल्याने भावना गवळी नाराज झाल्या होत्या. भावना गवळी यांच्याबरोबरच शिवसेनेच्या मुंबई बाहेरील खासदारांमध्ये मात्र नाराजी असल्याचे दिसून आले होते.