मुंबई: जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपीचा पाठींबा काढून सरकार पाडल्याबद्धल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. तसेच, नोटबंदीच्या मुद्द्यावरून खिंडीत गाठत मित्रपक्ष भाजपला चांगल्याच टपल्या मारल्या आहेत. 'नोटाबंदी करण्यामागे दहशतवाद मोडून काढण्याचेही एक कारण सांगितले गेले. मग आता पीडीपीसोबतच्या सरकारमधून बाहेर पडताना त्याच दहशतवादाच्या नावाने बोटे का मोडत आहात? कश्मीरात दहशतवाद वाढला, पाकडय़ांची घुसखोरी आणि हल्ले वाढले. युद्ध न करताही सैनिकांचे बलिदान वाढले. हे सर्व रोखणे व राज्य करणे कठीण होऊन बसले तेव्हा सर्व खापर मेहबुबा मुफ्तींवर फोडून भाजपने गाशा गुंडाळला. इंग्रजांनीही याच पद्धतीने देश सोडला होता. कश्मीर वाचविण्यासाठी कोणती योजना मोदी व त्यांच्या भक्तांकडे आहे?', असा सावाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.


मेहबुबांबरोबर सत्ता हा भाजपचा मूर्खपणा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'अखेर पलायन (इंग्रज असेच गेले!)' या मथळ्याखाली शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दै. सामनामध्ये ठाकरे यांनी एक लेख लिहला आहे. या लेखात उद्धव ठाकरे यांनी, 'कश्मीर खोऱ्यात अराजक निर्माण करून भारतीय जनता पक्षाने सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. कश्मीरची हालत इतकी कधीच बिघडली नव्हती, रक्ताचे पाट असे कधीच वाहिले नव्हते. हिंदुस्थानी जवानांचे बळी इतक्या मोठय़ा संख्येने कधीच गेले नव्हते. कश्मीरात हे भयंकर प्रकार भाजप राजवटीत घडले, पण या सगळ्याचे खापर मेहबुबा मुफ्तीवर फोडून भाजप साळसूदपणे सत्तेच्या बाहेर पडला आहे. कश्मीरात मेहबुबांबरोबर सत्ता स्थापन करणे हा मूर्खपणाचा आणि फाजील साहसाचाच निर्णय होता, पण देशातील एक राज्य आम्ही मिळवत आहोत. आम्ही अजिंक्य व अपराजित आहोत, आमचे उधळलेले घोडे सारा देश पादाक्रांत करतील या हावरेपणातून कश्मीरात पीडीपीबरोबर सत्ता स्थापन केली. त्याची फार मोठी किंमत देशाला, सैनिकांना व कश्मीरच्या जनतेला चुकवावी लागली आणि त्याबद्दल इतिहास भाजपला माफ करणार नाही, असा इशारा ठाकरे यांनी दिला आहे.


राज्य करणे म्हणजे पोरखेळ नव्हे


कश्मीरातील जनता रस्त्यावर उतरते व सैनिकांवर हल्ले करते. पाकिस्तानचे अतिरेकी घुसतात व आमच्या लष्करी तळांवर हल्ला करतात. रोज अनेक जवान शहीद होतात. निरपराध लोक मारले जातात व यावर देशाच्या सुविद्य संरक्षणमंत्री एखादे ट्विट करून सैनिकांना श्रद्धांजली वाहतात. पंतप्रधान सतत परदेशात असतात व कश्मीरचे नेमके काय करावे यावर पंतप्रधानांच्या मर्जीतील बाबू लोकांत चिंतन बैठक होते. एके दिवशी अचानक पंतप्रधानांचे विमान पाकिस्तानात उतरते, पंतप्रधान नवाज शरीफना भेटायला जातात व हिंदुस्थानातील भक्तगण ‘‘व्वा! व्वा! काय हा मास्टर स्ट्रोक. आता कश्मीर प्रश्न सुटलाच पहा’’ असे झांजा बडवून सांगतात. याला राज्य करणे म्हणत नाही. राज्य करणे म्हणजे पोरखेळ नव्हे. तसा पोरखेळ सध्या सुरू आहे. ‘‘पंडित नेहरू यांनी कश्मीरचा प्रश्न युनो’’त नेला अशी फक्त ओरड करून काय मिळवणार? असा सवालही ठाकरे यांनी विचारला आहे.


काश्मीरचा विचका सुधारण्याची मोदींना संधी होती


दरम्यान,  कश्मीरचा विचका पंडित नेहरूंमुळे झाला असे भक्तांचे सांगणे असेल तर गेल्या चार वर्षांत हा विचका सुधारण्याची संधी जनतेने तुम्हाला दिली होती. ‘‘प्रत्येक कश्मिरी पंडित पुन्हा आपल्या घरी जाईल’’ या घोषणेचे काय झाले? कश्मिरी पंडित आजही निर्वासित छावण्यातच खितपत पडले आहेत. एका बाजूला बांगलादेशातील हिंदूंना आसामात आणून मतपेढी वाढवण्याचा खटाटोप सुरू आहे, पण कश्मिरी पंडितांना हिंदुस्थानातच स्वतःच्या घरी जाता येत नाही. कुठे गेल्या त्या कश्मिरी पंडितांच्या घर वापसीच्या वल्गना? २०१४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी घटनेचे ३७० कलम रद्द करण्याचे आश्वासन तुम्ही देत होता, त्याचे काय झाले? नोटाबंदी करण्यामागे दहशतवाद मोडून काढण्याचेही एक कारण सांगितले गेले. मग आता पीडीपीसोबतच्या सरकारमधून बाहेर पडताना त्याच दहशतवादाच्या नावाने बोटे का मोडत आहात? असा रोखडा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.