मंबई : ईशान्येकडील राज्यांमध्ये भाजपला यश मिळाले. या यशाचे अभूतपूर्व असे वर्णण केले जात असले तरी,शिवसेनेने मात्र, मित्रपक्ष भाजपला चांगलेच चिमटे काढले आहेत. 'ईशान्येतील विधानसभा निवडणुकांचा विजयोत्सव आणखी काही दिवस सुरूच राहील. राजा उत्सवात मग्न असला तरी प्रजा भूक, रोजगाराच्या समस्यांनी तळमळत आहे, अशा शब्दांत शिवसेनेने भाजपच्या विजयाचे विश्लेशन केले आहे.


पराभवापेक्षा विजयाचे आत्मचिंतन करायला हवे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपवर निशाणा साधताना शिवसेनेचे मुखपत्र दै. सामनात लिहिलेल्या लेखात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात, 'त्रिपुरातील संपूर्ण काँग्रेस भाजपात विलीन झाली व त्या आधारावर त्रिपुरात विजय मिळाला. हे सत्य असले तरी त्रिपुरात वर्षानुवर्षे राज करणाऱ्यांचा नाकर्तेपणा व लोकांना गृहीत धरून राजकारण करण्याचा रोगच भाजप विजयास कारणीभूत ठरला, पण शेवटी विजय हा विजय असतो. भाजपने ईशान्येकडील राज्यांत विजय मिळवून उत्सव सुरू केला असला तरी देशासमोर भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांची सुटका त्यामुळे खरेच होईल काय? जे हरले त्यांनी पराभवाचे आत्मचिंतन करावे असे सांगितले गेले, पण पराभवापेक्षा विजयाचे आत्मचिंतन करायला हवे, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.


‘अच्छे दिन’चा वादा करून ‘अच्छे दिन’ आले नाहीत


‘गरिबी हटाव’चा नारा देऊन गरिबी हटली नाही व ‘अच्छे दिन’चा वादा करून ‘अच्छे दिन’ आले नाहीत. या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शेतकरी काँग्रेस राजवटीतही मरत होता व तो आताही तडफडतोय आणि मरतोय. कश्मीरात रोज रक्त सांडते आहे ते आपल्याच जवानांचे. त्रिपुरातील विजयोत्सव या सर्व समस्यांवरचा उतारा असेल तर तसे सरकारने जाहीर करायला हवे व देशाला सात दिवसांची राष्ट्रीय सुट्टी देऊन विजयोत्सवात सामील होण्याचे फर्मान काढले पाहिजे, असा टोलाही ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे.