अब्दुल सत्तार गद्दार, `मातोश्री`ची पायरी चढू देऊ नका- चंद्रकांत खैरे
अब्दुल सत्तार यांच्या दगाबाजीमुळे औरंगाबादमध्ये उपाध्यक्षपदी भाजपचा उमेदवार विजयी झाला
मुंबई: शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे नाराजीनाट्य आता वेगळेच वळण घेण्याची शक्यता आहे. अब्दुल सत्तार यांनी शुक्रवारी रात्री राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याची माहिती आज सकाळी समोर आली होती. खासदार अर्जुन खोतकर यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांकडून अब्दुल सत्तार यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु असताना चंद्रकांत खैरे यांनी मात्र त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
अब्दुल सत्तार गद्दार आहेत. त्यांना शिवसेनेतून हाकलून लावा. 'मातोश्री'ची पायरी चढू देऊ नका, असे वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केले आहे. या सगळ्याला औरंगाबाद जिल्हा परिषदेतील उपाध्यक्षपदाची निवडणूक कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या मीना शेळके विजयी झाल्या. मात्र, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे एल. जी. गायकवाड विजयी झाले. त्यामुळे चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर तोफ डागली. अब्दुल सत्तार यांच्या दगाबाजीमुळे उपाध्यक्षपदी भाजपचा उमेदवार विजयी झाला, असा आरोपच खैरै यांनी केला.
'अब्दुल सत्तार नाराज या निव्वळ अफवा'
आज सकाळीच चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सत्तार यांची भेट घेतली होती. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सत्तार यांनी आपली भूमिका बदलावी, यासाठी मी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते माझ्यासमोर शिवसेनेबद्दल वेडंवाकडं बोलले. तुमच्या शिवसेनेचे जिल्हा परिषदेत आहेच काय?, मी राजीनामा उद्धव ठाकरेंसमोर फेकला आहे, अशी भाषा सत्तार यांनी वापरली. त्यामुळे असले गद्दार पक्षात घेऊन काय फायदा? अब्दुल सत्तार यांच्याशी पक्षप्रमुखांनी चर्चा वगैरे करण्याची अजिबात गरज नाही. त्यांना 'मातोश्री'ची पायरी चढण्याचाही अधिकार नाही. सत्तारांना आता भाजपमध्येच जाऊ द्या, असे चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.