मुंबई : राज्यातील ठाकरे सरकारचा काल मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. यावेळी अनेकांना डावलण्यात आले. त्यामुळे काही नाराज असल्याची चर्चा होती. शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनीही नाराज नसल्याचे जरी सांगितले तरी त्यांची नाराजी लपून राहिलेली नाही. मला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आश्वासन दिले होते. काही गोष्टी आश्वासित केल्या होत्या, त्या सर्वांसमोर बोलायच्या नसतात असे सांगून मी त्यांची वेळ मागितलेली आहे. ते ज्यादिवशी वेळ देतील त्यावेळी मी त्यांचीशी बोलणार आहे. मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, न मिळाल्याने मला धक्का बसला आहे. माझ्याबाबतची अजून कटूता संपलेली नाही, याला वाव राहतो, अशी प्रतिक्रिया जाधव यांनी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथविधी सोहळ्याला आमदार भास्कर जाधव उपस्थित नव्हते. ते नाराज असल्याचे वृत्त होते. याबाबत 'झी २४ तास'शी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले, मी नाराज नाही, माझे मंत्रिमंडळ विस्तारत नाव नसल्याने मला आश्चर्याचा धक्का बसला. शिवसेनेत सर्वात जास्त निवडून आलेला आमदार आहे, प्रशासनाचा मला दीर्घकाळ अनुभव आहे, उत्कृष्ठ संसदपटू म्हणून मला पुरस्कार मिळाला आहे, सातत्याने निवडून येत आहे, संसदीय कार्यप्रणाली मला माहीत आहे. आदित्य ठाकरे यांना या अनुभवाचा फायदा देण्याचा प्रयत्न केला असता, मी निश्चिंत होतो की मंत्रिमंडळमध्ये असू, यासर्वांना एकाकी तडा गेला आहे, असे जाधव यांनी म्हटले आहे.


मला लाल दिव्याच्या गाडीचा मोह नाही, मला सत्तेचा मोह नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही गोष्टी आश्वासित केल्या होत्या, त्या सर्वांसमोर बोलायच्या नसतात असे सांगत मेरिटवर, गुणवत्ता याच्या जोरावर माझा विचार होऊ शकला नाही, योग्यतेमध्ये मी कुठे कमी पडलो, असा सवाल जाधव यांनी यावेळी उपस्थित केला.



नेत्यांचा विश्वास संपादन करण्यात कुठे कमी पडलो, जी पूर्वी कटुता निर्माण झाली होती, ती संपली की नाही, अशा शंकांनी मला धक्का बसला आहे, भास्कर जाधव म्हणालेत.