आमदार अपात्रतेचा निकाल म्हणजे मॅच फिक्सिंग? निकाल लागण्याआधीच मुख्यमंत्र्यांनी केलं मोठं विधान
MLA Disqualification: त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांना त्यांचा पराभव दिसू लागलाय, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लगावला.
MLA Disqualification: बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असा आमदार अपात्रतेचा निकाल आज लागणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या निकालाची सुनावणी करणार आहेत. दरम्यान शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांना त्यांचा पराभव दिसू लागलाय. म्हणून सरकार स्थापन झाल्यापासून सरकार पडणार, मुख्यमंत्री बदलणार असे ते सांगत आहेत. आजही आमचा व्हीप त्यांना लागू आहे. तशाच मेरीटवर आम्हाला निकाल अपेक्षित आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
आमच्याकडे 13 खासदार आणि 50 आमदार आहेत. यामुळेच निवडणूक आयोगाने खरी शिवसेना आम्हीच असल्याचे म्हटले आहे. चिन्ह आणि पक्ष आमचाच असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
काही लोक मॅच फिक्सिंगचा आरोप करतात. विधानसभा अध्यक्ष त्यांच्या अधिकृत वाहनाने माझ्या घरी आले. रात्रीच्या अंधारात लपून आले नाहीत. त्यांच्या मतदारसंघातील कामासाठी आले. अधिकाऱ्यांच्या समोर अधिकृत बैठक झाली. त्यांच्या बोलण्यात काही तथ्य नाही. त्यांच्या बाजुने निकाल लागला की संस्था चांगली म्हणतात, असेही ते यावेळी म्हणाले.
या सर्व मेरीटवर अध्यक्षांनी निकाल दिला पाहीजे. घटनाबाह्य ते लोक आहेत. त्यावेळी माजी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्याने सरकार अस्तित्वात नव्हत. त्यानंतर आलेलं हे बहुमताचं सरकार आहे. राज्यपालांनी यावर मोहर उमटवल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
ठाकरेंचे शिलेदार अनुपस्थितीत?
आमदार अपात्रतेच्या कायदेशीर लढाईत महत्वाची भूमिका बजावणारे ठाकरेंचे दोन शिलेदार निकालाच्या दिवशी मात्र अनुपस्थितीत राहणार आहेत. अनिल देसाई कोल्हापुरात तर अनिल परब मुंबईबाहेर आहेत. त्यामुळे अनिल परब आणि अनिल देसाई निकाल वाचनाच्या वेळी विधानभवनात उपस्थित राहणार नाहीत, अशी चर्चा आहे. सुप्रीम कोर्टातील कायदेशीर लढाई,निवडणूक आयोगातील लढाई तसंच विधानसभा अध्यक्षांसमोरील सुनावणीत या दोघांचा महत्वाचा सहभाग आहे. केवळ ठाकरे गटाचे वकील विधानभवनात उपस्थित राहणार आहेत. आमदार अपात्रतेच्या निकालाच्या वेळी ठाकरे गटाकडून वकील उपस्थित राहणार तर नेते अनुपस्थितीत राहणार? असा अंदाज वर्तवला जात आहे.