राम मंदिर मुद्द्यावर शिवसेनेची मोदींना पत्र लिहून `ही` विनंती
या पत्रात आहे तरी काय?
मुंबई : अयोध्येतील राम मंदिर न्यास समितीध्ये 'ट्रस्टी' म्हणून शिवसेनेतील किमान एका सदस्याचं नाव विचारात घ्यावं अशी विनंतीपर मागणी करणारं पत्र शिवसेना आमदारांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यापूर्वीच शिवसेना आमदारांकडून मोदींना पत्र लिहिण्यात आलं आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं आणि शिवसेना या पक्षाचं राम मंदिरासाठीच्या भूमिकांमध्ये असणारं योगदान पाहता ही मागणी करण्यात आली आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मोदींपुढे ही विनंती केली आहे. तेव्हा आता सरनाईकांच्या या पत्राची मोदींकडून दखल घेतली जाणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास एका खास रेल्वेने शिवसैनिक मोठ्या संख्येने अयोध्येत दाखल होत आहेत. तर, उत्तर प्रदेशातूनही काही शिवसैनिकांनी अयोध्या गाठण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आल्यानंतर आपल्या या किरकीर्दीला शंभर दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर निघाले आहेत.
मुख्यमंत्र्यांना या दौऱ्यात त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे यांची साथ असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. साऱ्या देशाचं या अयोध्या दौऱ्याकडे लक्ष असणार आहे.
राम मंदिराच्या बांधणीसाठी एका मंदिर न्यासाची स्थापना करावी असा निर्णय काही महिन्यांपूर्वी देण्यात आला. या अंतिम निकालानंतर काही काळाने उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची सर्व सुत्र हाती घेतली होती. राजकीय तज्ज्ञांच्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांचा हा दौऱा एका महत्त्वाच्या गोष्टीचा संदेश देणारा ठरु शकतो. महाविकासआघाडी सरकारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी केल्यानंतर हिंदुत्वाच्या भूमिकेवर शिवसेना ठाम असल्याचंच या दौऱ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित केलं जाऊ शकतं असं म्हटलं जात आहे.