शिवसेनेचे आमदार जयपूरला रवाना होणार
महाराष्ट्र राज्यात सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. मातोश्रीवरील उद्याच्या बैठकीनंतर शिवसेनेचे आमदार जयपूरला रवाना होणार आहेत.
मुंबई : राज्यात सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. मातोश्रीवरील उद्याच्या बैठकीनंतर शिवसेनेचे आमदार जयपूरला रवाना होणार आहेत. तर दुसरीकडे उद्याच काँग्रेसच्या आमदारांची बैठक होत आहे. या बैठकीत काँग्रेसचा विधीमंडळ नेता निवडण्यात येणार आहे. दिल्लीपाठोपाठ आता मुंबईतही सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आलाय. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठका सुरू असताना शिवसेनेच्या गोटातही वेगानं घडामोडींना घडत आहेत.
शिवसेनेच्या आमदारांना उद्या मुंबईत बोलवण्यात आले आहे. उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी भेट झाल्यानंतर या सर्व आमदारांना मुंबईहून जयपूरला रवाना करण्यात येणार आहे. उद्या सर्व आमदारांची मातोश्रीवर बैठक बोलावली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे आमदारांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर हे सर्व आमदार जयपूरला रवाना होणार आहेत. मात्र शिवसेना आमदारांची गोव्याला जाण्याची इच्छा असल्याचे शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे.
नव्या महाविकासआघाडी सरकारमध्ये काँग्रेसच्या वाट्याला उपमुख्यमंत्रिपद येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळासाहेब थोरात यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची माळ पडणार आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, तर बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे अजित पवार उपमुख्यमंत्री असे सरकार सत्तेवर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, राष्ट्रवादीला अडीच वर्षं मुख्यमंत्रीपद मिळावं, यासाठी अजित पवार आग्रही असल्याचे समजते आहे.
महाराष्ट्रात सत्ता स्थापन करताना समसमान वाटपासाठी आग्रही रहा अशा सूचना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नेत्यांना केल्या आहेत. काँग्रेसकडे ४४ सदस्यसंख्या असली तरी ती सत्ता स्थापनेसाठी तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे समसमान मागणीसाठी आग्रही रहा अशा सूचना सोनिया गांधींनी दिल्या आहेत. चर्चा वैयक्तिकरित्या नाही. कोणाला काय मिळावर याची नाही, तर कुठल्या पक्षाला काय खाती मिळाली पाहिजेत यासंदर्भातली आहे. त्यामुळे आग्रही रहाण्याच्या सूचना दिल्या आहेत.