मुंबई : महाराष्ट्र राज्यात सत्तेस्थापनेचा तिढा सुटण्याचे संकेत मिळत आहेत. महाविकासआघाडीच्या नेतृत्वाखीला सत्ता स्थापन होण्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, कोणताही दगाफटका नको म्हणून शिवसेनेच्या सर्व आमदारांना तातडीने मुंबईत बोलविण्यात आले. सर्व आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले आणि सरकार स्थापन्याबाबत तसेच मुख्यमंत्री पदाबाबत त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. त्यानंतर हे आमदार राजस्थानमधील जयपूरला रवाना होणार होते. परंतु सेनेचे आमदार मुंबईतच आहेत. आम्ही जयपूरला काही जाणार नाही, अशी माहिती शिवसेनेचे रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी दिली. तसेच मुख्यमंत्री पदाचा सर्वाधिकार हा उद्धव यांना दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर दुसरीकडे शिवसेना नेते सुनील प्रभू, प्रताप सरनाईक यांनीही उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांना मुंबईतच राहण्याचे आदेश दिले आहेत. जयपूरला वगैरे कुठेही आमदार जाणार नसून शिवसेनेचे सर्व आमदार मुंबईतच राहणार असल्याचे सुनील प्रभू यांनी स्पष्ट केले. त्याआधी सेनेचे आमदार जयपूरला ज्या हॉटेलमध्ये काँग्रेसचे आमदार उतरले होते. त्याठिकाणी राहणार असल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे चर्चा जोरदार होती. आता सेनेचे आमदार कुठेही जाणार नाही तर ते मुंबईत राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.


राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस महाविकासआघाडीचे सरकार येणार असल्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने जोरबैठकांवर भर दिसून येत आहे. राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकासआघाडीचे सरकार आल्यास राज्यात शिवसेनेला मुख्यमंत्रीपदासह ११ कॅबिनेट आणि ५ राज्यमंत्रिपद तर राष्ट्रवादीला ११ कॅबिनेट आणि ४ राज्यमंत्रिपदं देण्यात येतील. काँग्रेसला ९ कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्रिपद देण्यात येतील. तर विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसच्या वाट्याला जाणार आहे. मुख्यमंत्रिपदासाठी  उद्धव ठाकरे यांच्या नावावर एकमत झाल्याने आता मुख्यमंत्रिपदाच्या पालखीत उद्धव ठाकरे बसणार का, याकडेच साऱ्या राज्याचं लक्ष लागले आहे.