अमित जोशी, झी मीडिया मुंबई : अमित शाह यांच्या तीन दिवसांचा मुंबई दौरा मातोश्री भेटीनेच जास्त चर्चेत राहिला. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी सेनेचा पाठींबा मिळवण्याचा दावा भाजपाच्या सूत्रांनी केला आहे. मात्र शिवसेना याबाबत भाजपाला शेवटपर्यंत झुलवतच ठेवण्याची शक्यता जास्त आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मातोश्री भेटीमध्ये अमित शाह उद्धव ठाकरे यांना शांत करतात का, का उद्धव ठाकरे नमते घेतात का, दोन्ही पक्षांमध्ये दिलजमाई होते का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.


असं असलं तरी 3 दिवसाच्या दौ-यात अमित शाह यांनी राज्यातील पक्षाचा वरपासून खालपर्यंत संघटना मजबूत करण्याबाबत आढावा घेत जोरदार जोरबैठका घेतल्या.


काय केले अमित शाह यांनी मुंबईत


- अमित शाह यांचा पक्ष संघटना मजबुत करण्यावर भर


- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भरघोस यश आल्याने पक्षात काहीसा सुस्तपणा आला होता तो दूर करण्यावर भर दिला गेला


- मंत्र्याची कामगिरी, पक्षाचे विविध विभाग, पक्षाचा कणा असलेली बुथ रचना, सोशल मिडिया सेल याबाबत बैठका घेतल्या


- केंद्र - राज्य सरकार यांच्या योजना आणि पक्षीय पातळीवर अंमलबजावणी याचा आढावा घेतला.. घटक पक्षांची स्थिती - मानसिकता यांवर चर्चा केली


- शेतकरी कर्जमाफी , त्याची अंमलबजावणी, राज्यावर पडणारा बोझा यावरही चर्चा झाली


- मध्यावती निवडणूक तयारीबाबतही आढावा घेतला


- थेट पक्षाच्या आमदार - खासदार यांच्याशी संवाद साधत राज्यातील स्थिती जाणून घेतली


असं असलं तरी आपल्याला हवी तशी ठोस भूमिका शिवसेनेकडून वदवून घेण्यास अमित शाह यांना अपयशच आलंय असं म्हणावं लागेल. कारण आत्तापर्यंतचा झालेला सर्व अपमान गिळत मातोश्रीच्या पाय-या चढल्यानंतर सुद्धा स्वतः भाजपाने या भेटीबद्दल अधिकृत प्रतिक्रिया देणे टाळले आहे. यावरूनच भाजप शिवसेनेमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे स्पष्ट होत आहे.