शिवसेनेने वचननाम्यात `आरे`चा उल्लेख टाळला; उद्धव ठाकरे म्हणाले...
![शिवसेनेने वचननाम्यात 'आरे'चा उल्लेख टाळला; उद्धव ठाकरे म्हणाले... शिवसेनेने वचननाम्यात 'आरे'चा उल्लेख टाळला; उद्धव ठाकरे म्हणाले...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_500x286/public/2019/10/12/352860-873759-uddhav-thackeray3.jpg?itok=R1G3lpW9)
आरेसाठी एकट्या शिवसेनेला जबाबदार धरू नका.
मुंबई: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी शिवसेनेकडून वचननामा जाहीर करण्यात आला. यामध्ये १० रुपयांत जेवण, रस्ते, विद्यार्थी एक्स्प्रेस आणि वीज दरकपात अशा अनेक आश्वासनांचा समावेश आहे. परंतु, मुंबईच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या 'आरे'चा कोणताही उल्लेख या जाहीरनाम्यात करण्यात आलेला नाही.
काही दिवसांपूर्वीच मेट्रो रेल्वेच्या नियोजित कारशेडसाठी सरकारकडून मोठ्याप्रमाणावर झाडे तोडण्यात आली होती. यावरून पर्यावरणवादी आणि स्थानिक नागरिक आक्रमक झाले होते. त्यावेळी आम्ही सत्तेत आल्यावर 'आरे'ला जंगल घोषित करू, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.
अशी आहेत शिवसेनेच्या वचननाम्यातील १० प्रमुख वचनं...
त्यामुळे आजच्या शिवसेनेच्या वचननाम्यात 'आरे'चा उल्लेख असणे अपेक्षित होते. मात्र, शिवसेनेच्या वचननाम्यात याचा पुसटसा उल्लेखही केलेला नाही. याविषयी विचारणा केली असता आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, शिवसेनेकडून विभागनिहाय प्रादेशिक वचननामे प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यामध्ये 'आरे'चा उल्लेख आहे. सर्वच प्रादेशिक मुद्द्यांना मुख्य वचननाम्यात स्थान दिले असते तर तो खूपच जाडजूड झाला असता.
आदित्य यांच्या या स्पष्टीकरणानंतरही पत्रकारांकडून 'आरे'विषयी प्रश्नांची सरबत्ती सुरुच राहिली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी चर्चेची सूत्रे हाती घेत म्हटले की, आरेसाठी एकट्या शिवसेनेला जबाबदार धरता येणार नाही. त्याऐवजी सर्व पक्षांना समोरासमोर बसवा आणि त्यांची भूमिका स्पष्ट करायला सांगा, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.