मुंबई : एलफिन्स्टन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर मनसेने मोर्चा काढत निषेध व्यक्त केला. तसेच रेल्वे स्थानकांवर असलेल्या फेरीवाल्यांना १५ दिवसांत हटविण्याचं अल्टिमेटमही मनसेनं दिलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसेने दिलेल्या अल्टिमेटमला दोन दिवस होताच रेल्वे स्थानकातून फेरीवाले गायब झाल्याचं पहायला मिळत आहे. त्यानंतर आता शिवसेना आणि मनसे यांच्यात श्रेयवाद सुरु झाल्याचं दिसत आहे.


फेरीवाले निघून गेल्यानंतर रेल्वे स्थानक परिसर मोकळा झाल्याचं दिसत आहे. त्यानंतर लगेचच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेत आपल्यामुळेच तीन मुद्दे मार्गी लागल्याचा दावा केला आहे.



शिवसेनेने केलेल्या पाठपूराव्यामुळे रेल्वे परिसरातले फेरीवाली प्रशासनाने हटवले, जीएसटीमध्ये कपात करण्यात आली आणि अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या असा दावा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. शिवसेनेने केलेल्या पाठपुराव्यामुळेच मंत्रिमंडळ बैठकीत तीन प्रश्न मार्गी लागले आहेत असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.


दरम्यान, मध्य रेल्वे प्रशासनाने सहा ऑक्टोबर रोजी सर्व स्टेशन मास्तरांना एक पत्र लिहीलं असून त्यामध्ये फेरीवाल्यांना तात्काळ हटविण्याचं म्हटलं आहे.




उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे :


- जनतेत रोष आहे त्याची दखल घ्या पण असंतोषाचे रूपांतर उद्रेकात झाले तर त्याला भाजप सरकार जबाबदार राहील


- जनतेच्या मनाचा कानोसा सरकारने घ्यावा व तसा कारभार करावा


- चांगल्या गोष्टीसाठी आम्ही सदैव सरकारसोबत राहु, नाही तर आम्ही जनतेसोबत आहोत


- लोकांना ओरबाडले जात आहे


- करावर कर लादले जात आहेत


- पेट्रोल-डिझेलचे दर ज्या पटीत वाढवले त्या पटीतच कमी करा


- चांगल्या गोष्टीसाठी आम्ही सरकारसोबत आहोत


- सरकारने कमी केलेला कर ही दिवाळी भेट नाही. सरकारचा नाईलाज आहे. जनरेट्यापुढे सरकार झुकल्याचे हे द्योतक आहे