मुंबई : वरळीतून विधानसभा निवडणूक लढवणारे आदित्य ठाकरे यांच्या 'केम छो वरली' या गुजराती बॅनरवर प्रचंड टीका होतेय. सोशल मीडियावर यावरून जोरदार ट्रोलिंग झाल्यानंतर 'केम छो वरळी' असा मजकूर लिहिेलेले बॅनर शिवसेनेनं तत्काळ काढून टाकले. हे बॅनर नेमके कुणी लावले होते, यावरूनही शिवसैनिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण असल्याचं समजतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्थानिक शिवसैनिकांना या बॅनरबाबत काहीच माहिती नव्हती. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून हे फ्लेक्स लावण्यात आले असावेत, अशी माहिती शिवसेनेतल्या सूत्रांनी दिलीय. केवळ गुजरातीच नव्हे तर तेलुगू आणि तमिळ भाषेतले बॅनरही वरळीत लावण्यात आले होते. 


अमराठी भाषकांची मतं मिळवण्यासाठी आदित्य ठाकरेंच्या व्यूहरचनाकारांनी ही रणनीती आखली होती. मात्र आदित्य ठाकरेंनी मराठी माणसांचीच शिवसेना ही प्रतिमा पुसण्याचा चंग बांधलाय की काय, अशी टीका होऊ लागली. 


शिवसेनेचा वाघ आता ढोकळा खायला लागला अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या. त्यामुळंच आता हे बॅनर तातडीनं उतरवण्यात आलेत.