मुंबई : आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी आयोध्येतील राम मंदिर प्रश्नाबाबत व्यक्त केलेल्या मतावरून शिवसेनेने जोरदार टीकास्त्र सोडले आहे. शिवसेनेच्या टीकेचे बाण हे श्री श्री रविशंकर यांच्यासोबतच केंद्र सरकारवही सुटले आहेत. शिवसेनेने टीकेचे बाण सोडताना केंद्र सरकारची संभावना थेट पाण्यात बसलेल्या म्हशीसोबत केली आहे.


...तर चोवीस तासात राम मंदिराचे काम सुरू होईल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दैनिक सामनातील लेखात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 'केंद्रात संपूर्ण बहुमताचे हिंदुत्ववादी ‘भाजप’ सरकार बसले आहे. मनात आणले तर एखादा अध्यादेश काढून ते चोवीस तासांत राममंदिर उभारणीचे राष्ट्रीय कार्य सुरू करू शकतात. पण सरकारचेही या प्रश्नी पाण्यात बसलेल्या म्हशीप्रमाणे रवंथ करणे सुरू आहे', असे ठाकरे यांनी म्हटले आहे.


राम मंदिर प्रश्नात श्री श्री रविशंकर यांची लुडबुड


दरम्यान, ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या श्री श्री रविशंकर यांच्यावरही उद्धव ठाकरे यांनी जोरदार निशाणा साधताना ''आर्ट ऑफ लिव्हिंग’वाले एक आध्यात्मिक म्हणवून घेणारे गुरू श्री श्री रविशंकर हे गेल्या दोनेक वर्षांपासून राममंदिरप्रश्नी लुडबुड करू लागले आहेत व यानिमित्ताने प्रकाशझोतात राहण्याची धडपड करीत आहेत. या गुरू महाराजांनी आता असा आध्यात्मिक संदेश दिला आहे की, ‘अयोध्येत मंदिर प्रश्न सुटला नाही तर हिंदुस्थानची अवस्था सीरियासारखी होईल.’ आता गुरू महाराजांनी ही धमकी दिली आहे, भविष्यवाणी वर्तवून खळबळ उडवली आहे की सीरियातील धर्मांध ‘इसिस’ टोळय़ांना मंदिर प्रश्नात ओढून एकप्रकारे नव्या अराजकाची सुपारी दिली आहे? याचा तपास आता राष्ट्रीय सुरक्षेसाठी करणे गरजेचे आहे, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.