मुंबई: सत्तावाटपाच्या चर्चेत शिवसेना नरमली किंवा माघार घेतली, ही केवळ अफवा असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले. शिवसेनेने फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युलाचा आग्रह धरल्यामुळे सरकार स्थापनेला अजून मुहूर्त मिळालेला नाही. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपने शिवसेनेला असे कोणतेही वचन दिले नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर बुधवारी शिवसेनेचा सूर नरमल्याची चर्चा सुरु झाली होती. संजय राऊत, आमदार अनिल परब आणि ज्येष्ठ नेते दिवाकर रावते फिफ्टी फिफ्टीच्या फॉर्म्युलावर ठाम असले तरी पक्षातील इतर नेत्यांनी फार ताणू नका, असा सूर लावला आहे. यानंतर संजय राऊत यांनीही एकत्र येण्यातच दोन्ही पक्षांचे हित असल्याचे म्हटले होते. त्यामुळे भाजपच्या आक्रमक पवित्र्यासमोर शिवसेना नरमल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली होती. 


गरज सरो आणि वैद्य मरो; शिवसेनेचा भाजपला टोला


मात्र, संजय राऊत यांनी ट्विट करून या चर्चेत तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. शिवसेना नरमली, माघार घेतली, तडजोड केली, समसमान पदांची मागणी सोडली वगैर अशा पुड्या सुटू लागल्या आहेत. ये पब्लिक है, सब जानती है. जे ठरले होते त्या प्रमाणेच होईल, असे राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 



शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदी आदित्य ठाकरे की अनुभवी एकनाथ शिंदे?


तत्पूर्वी आज 'सामना'तील अग्रलेखातून भाजपला पुन्हा एकदा लक्ष्य करण्यात आले आहे. २०१४ साली देशात मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भव्य यश मिळताच भाजपने शिवसेनेसोबतची युती तोडली. २०१९ साली तसेच यश मिळाल्याप्रमाणे 'गरज सरो वैद्य मरो'चा दुसरा अंक सुरु झाल्याचे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'त म्हटले आहे. मात्र, कितीही पेच किंवा चक्रव्युह निर्माण झाले तरी शिवसेनेला अशा संकटांची पर्वा नाही, असाही इशाराही या अग्रलेखातून देण्यात आला आहे.