पर्रिकरांची चिता पेटत असताना वखवखलेल्या सत्तासुरांनी सर्वकाही उरकून घेतले- शिवसेना
सोमवार मध्यरात्रीऐवजी मंगळवारची सकाळ उजाडली असती तर गोव्यावर असा कोणता डोंगर कोसळणार होता?
मुंबई: शिवसेना-भाजपमध्ये युती झाल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये सर्वकाही आलबेल झाले आहे असे वाटत असतानाच सेनेने पुन्हा एकदा भाजपचे कान टोचले आहेत. मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर सत्ता टिकवण्यासाठी गोव्यात ज्याप्रकारे राजकीय डावपेच खेळले गेले त्यावरून सेनेने संबंधितांना लक्ष्य केले. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'त यासंदर्भात भाष्य करताना म्हटले आहे की, पर्रिकरांच्या निधनानंतर गोव्यात जणू ‘रात्रीस खेळ चाले’या राजकीय मालिकेचे चित्रीकरण सुरु होते. पर्रिकर यांची चिता पेटत होती व सत्तातूर भुते सत्तेसाठी एकमेकांच्या मानगुटीवर बसत होती. निदान चार तास थांबायला हरकत नव्हती. पर्रिकरांच्या पार्थिवावर वाहण्यात आलेल्या फुलांचे अद्याप निर्माल्य झालेले नाही, पण बकासुराप्रमाणे सत्तासुरांची वखवख वाढल्याने रात्रीच्या अंधारात सर्वकाही उरकून घेण्यात आले. सोमवार मध्यरात्रीऐवजी मंगळवारची सकाळ उजाडली असती तर गोव्यावर असा कोणता डोंगर कोसळणार होता?, असा सवाल शिवसेनेने अग्रलेखातून उपस्थित केला आहे. याचा रोख साहजिकच भाजप आणि गोव्यातील घटकपक्षांच्या दिशेने आहे.
भाजपाला यावेळेस 210 जागा मिळतील, सरकार एनडीएचे असेल- संजय राऊत
याशिवाय, भाजपकडून घटकपक्षांना उपमुख्यमंत्रीपद देण्याच्या भूमिकेवरही शिवसेनेने नाराजी व्यक्त केली आहे. फक्त १९ आमदारांच्या बहुमतासाठी दोन उपमुख्यमंत्रीपदे बाहेरच्यांना देऊन गोव्यात सत्ता टिकवावी लागली. आता विधानसभेत बहुमत आहे, पण सरकार किती टिकेल हा प्रश्न आहे. विजय सरदेसाई किंवा मगोचे सुदिन ढवळीकर यांच्या भूमिका व निष्ठा संशयास्पद आहेत. रात्रीच्या अंधारातच नव्हे तर दिवसाढवळय़ा नवा डाव मांडायला ते मागेपुढे पाहणार नाहीत. या भयातून रात्रीच खेळ उरकून टाकला गेला. गोव्याची जनता तरी हतबलतेशिवाय काय करणार? आम्ही फक्त सहानुभूतीचा उसासा सोडू शकतो, असा टोला शिवसेनेने लगावला आहे.
रात्री २ वाजता पार पडला गोव्याचे नवे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा शपथविधी