`आमचे सरकार पाच काय पंचवीस वर्षे टिकेल`
महाराष्ट्राच्या प्रश्नावर लढण्यासाठी शिवसेनेची स्थापना झाली होती.
मुंबई: महाविकासआघाडीचे सरकार पाच काय २५ वर्षे टिकेल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले. सत्तास्थापनेच्या लढाईतून भाजपने माघार घेतल्यानंतर नवाब मलिक प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्यासारख्या नेत्यांकडून महाविकासआघाडीचे सरकार पाच वर्षे टिकणार नाही, असे सांगितले जाते आहे. या पक्षांच्या विचारसरणीत फरक असल्यामुळे हे सरकार स्वत:च्याच ओझ्याखाली दबेल, अशी भीतीही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली होती.
मात्र, नवाब मलिक यांनी भाजप नेत्यांचा हा दावा फेटाळून लावला. शिवसेना हा पक्ष धर्माच्या मुद्द्यावर जन्माला आलेला नाही. महाराष्ट्राच्या प्रश्नावर लढण्यासाठी शिवसेनेची स्थापना झाली होती. उलट भाजपासोबत हातमिळवणी केल्याने शिवसेनेची फरपट झाली. त्यामुळे महाविकासआघाडीचे सरकार धर्म, जाती आणि भाषेवरून कोणावरूनही अन्याय होऊन देणार नाही. आमचे सरकार पाच काय पंचवीस वर्षे टिकेल, असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला.
तसेच शरद पवार यांनी तथाकथित चाणक्यांना आपणच खरे चाणक्य असल्याचे दाखवून दिल्याचे वक्तव्यही त्यांनी केले. दरम्यान, थोड्यावेळात ट्रायडंट हॉटेलमध्ये महाविकासआघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडणार आहे. यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल.