मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी युतीची घोषणा होण्यापूर्वीच शिवसेनेकडून उमेदवारांना एबी फॉर्म वाटले जात असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आज संध्याकाळपर्यंत शिवसेनेकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार असल्याचेही सांगितले जात आहे. यामध्ये प्रामुख्याने कोल्हापूरमधील मतदारसंघांचा समावेश आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या दिल्लीत विधानसभा निवडणुकीचे उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपच्या सुकाणू समितीची (कोअर) बैठक सुरु आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे नेते उपस्थित आहेत. यावेळी शिवसेनेसोबतच्या युतीचा निर्णयही होण्याची शक्यता आहे. मात्र, शिवसेनेने हा निर्णय होण्यापूर्वीच आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म वाटले आहेत. परंतु, या जागा शिवसेनेच्या कोट्यातील असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे शिवसेनेच्या या कृतीने युतीच्या चर्चेवर विपरीत परिणाम होणार नाही, असे सांगितले जात आहे. 


मात्र, आता भाजप काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेने आपल्या या निर्णयाची कल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली होती का, याबद्दल ठोस माहिती उपलब्ध नाही. दरम्यान, भाजपकडूनही आज संध्याकाळी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाऊ शकते. 


सूत्रांच्या माहितीनुसार, पहिल्या यादीत संजय घाटगे (कागल), संग्रामसिंह कुपेकर (चंदगड), राजेश क्षीरसागर(कोल्हापूर उत्तर), चंद्रदीप नरके (करवीर), डॉ. सुजित मिचणेकर (हातकणंगले), सत्यजीत पाटील (शाहुवाडी), प्रकाश आबिटकर (राधानगरी), उल्हास पाटील (शिरोळ) यांचा समावेश आहे.


याशिवाय,  कोकणात उदय सामंत (रत्नागिरी), सदानंद चव्हाण (चिपळूण), राजन साळवी (राजापूर),  दीपक केसरकर (सावंतवाडी), भास्कर जाधव (गुहागर) या विद्यमान आमदारांना तर दापोलीतून रामदास कदम यांचे पूत्र  योगेश कदम (दापोली)  यांना संधी देण्यात आली आहे. तसेच मुंबईतील बहुतांश विद्यमान आमदारांनाही एबी फॉर्म देण्यात आले आहेत.


एबी फॉर्म मिळालेले अन्य नेते पुढीलप्रमाणे

१. भरत गोगावले (महाड)
२. वैभव पाटील (कुडाळ)
३. संजय शिरसाठ (औरंगाबाद पश्चिम)
४. संतोष बांगर (कळमनुरी)
५. संजय राठोड (दिग्रस)
६. राहुल पाटील (परभणी)
७.शशिकांत खेडकर (सिंदखेडराजा)
८.संजय रायमूलकर (मेहकर)
९.राजाभाऊ वाजे (सिन्नर)
१०. अनिल कदम (निफाड)
११. योगेश घोलप (देवळाली)
१२. दादा भुसे (मालेगाव बाह्य)
१३. ज्ञानराज चौगुले (उमरगा)
१४. नितीन देशमुख ( बाळापूर)
१५. यामिनी जाधव (भायखाळा)