मुंबई : महाविकासआघाडीचं सरकार आल्यानंतर जवळपास महिन्याभराच्या दीर्घ कालावधीनंतर अखेर या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. मुंबईतील विधानभवनासमोर असणाऱ्या प्रांगणामध्ये सोमवारी मोठ्या दिमाखात या शपथविधी सोहळ्याची सुरुवात झाली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्यासह शपथ घेतलेले मंत्री आणि राजकारणातील बऱ्याच दिग्गजांची उपस्थिती पाहायला मिळाली. शपथविधी सोहळ्यादरम्यान मंत्रिपदासाठी वर्णी लागणाऱ्या आमदारांच्या नावांमध्ये सर्वाधिक चर्चा रंगली ती म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे यांची. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वरळी मतदार संघातून निवडून आलेल्या आदित्य ठाकरे यांनी शपथविधी सोहळ्यादरम्यान महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदाची सपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यावेळी आदित्य यांना मंत्रिपदाची शपथ दिली. यावेळी शपथविधीसाठीचा मायना वाचत असताना त्यांनी आपल्या आईचंही नाव घेतलं. ठाकरे कुटुंबासाठी अतिशय महत्त्वाच्या अशा या क्षणी आदित्य ठाकरे यांच्या आई, रश्मी ठाकरे आणि भाऊ तेजसचीही उपस्थिती होती. 


पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरत विजयी होणाऱ्या आदित्य यांना मंत्रिपदाची शपथ घेत असताना पाहून आदित्य यांच्या आईचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत होता. यावेळी शपथ ग्रहण केल्यानंतर आदित्य यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या. 


राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा Live




आदित्य ठाकरे शपथविधी सोहळ्यासाठी व्यासपीठावर आले, तेव्हा उपस्थितांमधील अनेकांनी तेथे जल्लोषही केल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्रातील राजकारणाचं हे नवं आणि तितकंच अनोखं पर्व पाहता आता, या नव्या जोमाच्या मंत्र्यांवर राज्याचं आणि अर्थातच विरोधी पक्षांचंही लक्ष असेल हे नाकारता येणार नाही.