मुंबई : महाराष्ट्रासह मुंबईत विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांकडून प्रचारांच्या सभांचा धडाकाच सुरू केला आहे. मतदाराला आपल्या बाजूने करून घेण्यासाठी सर्व पक्ष आणि उमेदवार आपापली नामी शक्कल लढवत आहे. असं असताना मुंबईतील कळवा-मुंब्रा मतदारसंघात अजब गोंधळ पाहायला मिळत आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेच्या उमेदवार असलेल्या अभिनेत्री दिपाली जहांगीर सय्यद यांनी निवडणूक येण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. कळवा-मुंब्रा हा परिसर हिंदू-मुस्लिम मतदारांनी व्यापलेला आहे. या मतदारसंघात आपली पकड घट्ट करण्यासाठी शिवसेनेच्या उमेदवार दिपाली सय्यद दोन नावांनी प्रचार करत आहेत. पण त्यांनी सादर केलेल्या शपथपत्रात मात्र दिपाली जहांगीर सय्यद असं नाव नमूद करण्यात आलं आहे. 



हिंदू मत मिळवण्यासाठी हिंदू मतदार असलेल्या ठिकाणी उमेदवार दिपाली भोसले या नावाने प्रचार करत आहेत. तर मुस्लिम मतदारांची मत मिळवण्यासाठी उमेदवार सोफिया सय्यद या नावाने प्रचार करत आहेत. यामुळे मतदारांचा संभ्रम झाला आहे. कळवा-मुंब्रा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी दिपाली सय्यद वेगवेगळ्या नावाने प्रचार करत असल्याचा आरोप केला आहे. 



जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादीचे उमेदवार असून याच मतदारासंघातून ते दोनदा निवडून आमदार झाले आहे. यंदाचं जितेंद्र आव्हाडांच तिसरं वर्ष आहे. या मतदारसंघात जितेंद्र आव्हांडाची पक्कड सैल करण्यासाठी शिवसेनेने नावाचा अनोखा फंडा वापरला आहे. शिवसेनेने एका बाणातून दोन शिकार करण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेने सेलिब्रिटी उमेदवार देऊन ही उमेदवारी चर्चेत आणली असून मुस्लिम उमेदवार देऊन मुस्लिम मतदारांना खूष ठेवलं आहे. 


मराठी सिनेमांमधून कलाविश्वात पदार्पण केलेल्या दिपाली सय्यद यांच लग्नाआधीचं नाव दिपाली भोसले आहे. मुस्लिम व्यक्तीशी लग्न करून दिपाली भोसलेचं नाव सोफिया सय्यद झालं. पण कलाविश्वात आणि रोजच्या वापरात त्यांनी दिपाली सय्यद असं नाव लावलं. दिपाली यांनी आतापर्यंत 30 हून अधिक सिनेमे केले आहे. दिपाली यांना 'इंस्टा क्वीन' म्हणून देखील ओळखलं जातं. इंस्टाग्रामवर त्यांचे अनेक फॉलोअर्स आहेत.