मुंबई : भाजप सरकारची ‘मी लाभार्थी’ या जाहीरात वेगवेगळ्या मुद्द्यांनी चर्चेत येत आहे. जाहीरातीत दाखवलेल्या लाभार्थ्यापर्यंत खऱ्या अर्थाने लाभ पोहोचलाच नाही अशी टीका विरोधकांनी केली.आता सरकारच्या या जाहीरातीलाच कंटाळलेला वर्ग समोर आला आहे. या जाहीरातीला कंटाळून शिवाजी पार्क परिसरातील काही रहिवाशांनी भाजप सरकारविरोधात आवाज उठविला आहे.


२६.३३ कोटीचा खर्च 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त‘मी लाभार्थी’या टॅगलाईनखाली जाहीराती दाखविण्यात येत आहेत. या जाहिरातीच्या कॅम्पेनसाठी भाजपने तब्बल २६.३३ कोटी रुपये खर्च केले आहेत.हेच पैसे जनतेच्या कल्याणासाठी खर्च केले तर ? असा प्रश्न सोशल मीडियावर केला जात आहे.


 स्वत: चीच पाठ थोपटतायत


‘देशातील शेतकरी, व्यावसायिक, टॅक्सीवाले, रिक्षावाले, नोकरदार वर्ग  त्रस्त आहे. सगळीकडे सरकारविरोधात आंदोलने होत असताना सरकार अशा प्रकारच्या जाहीराती करुन स्वत:ची पाठ थोपाटून घेत आहे. त्यामूळे ही जाहीरात बंद करावी असे शिवाजी पार्क येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. जाहीरातींवर खर्च होणारे हे पैसे सरकारने जनतेच्या सुविधांसाठी खर्च करावे या भूमिकेवर रहिवाशी ठाम आहेत.  


जाहिरातींचा वीट 


यासंदर्भात शिवाजी पार्कातील रहिवाशांनी जिल्हाधिकारी संपदा मेहता यांना पत्र लिहिले असून आपले गाऱ्हाणे त्यात मांडले आहे. ‘आम्ही जाहिरातबाजीच्या विरोधात नाही मात्र प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. सतत भाजपची ती जाहिरात बघून वीट आला आहे. भाजपने आता कुठेतरी थांबायला हवे आणि जनतेच्या विकासाकडे लक्ष द्यायला हवे' असे इथले रहिवाशी सांगतात. 


'पैशाचा सदुपयोग करा'


तसेच या पैशाचा उपयोग रस्त्यांची स्थिती, फुटपाथ, चांगले बगीचे, मुलांना खेळण्यासाठी स्वच्छ मैदानांसाठी केला जावा असा सल्लाही सरकारला देण्यात आला आहे.