मुंबई : भाजपची ऑफर स्वीकारुन शिवसेनेनं सत्तेत सहभागी व्हावं असं आवाहन केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. तर आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा अनुभव नाही. त्यांनी राज्यकारभाराचं प्रशिक्षण घ्यावं असं रोखठोक मत रामदास आठवलेंनी व्यक्त केलं आहे. उपमुख्यमंत्री आणि 16 मंत्रीपदांची ऑफर स्वीकारावी असं आवाहनही त्यांनी सेनेला केलं. संजय राऊतांनी तोडण्याची भूमिका घेण्यापेक्षा जोडण्याची भूमिका घ्यावी असंही ते म्हणाले. रामदास आठवले यांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर ते बोलत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप-शिवसेनेत अखेर नऊ दिवसांनंतर चर्चेची कोंडी फुटणार आहे. आजच मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंमध्ये फोनवरून किंवा प्रत्यक्षात भेटून चर्चा होणार असल्याची माहिती शिवसेनेच्या गोटातून मिळाली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी अखेर मुख्यमंत्री पुढाकार घेणार आहेत. त्यामुळे थेट मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंमध्येच चर्चा होण्याची शक्यता आहे.


शिवसेनेनं ताठर भूमिका घेतल्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये चर्चेची दार बंद झालेली होती. मात्र आता मुख्यमंत्र्यांनीच ही कोंडी फोडण्यासाठी पुढाकार घेण्याचं ठरवल्यानं आता कोंडी फुटणार आहे.


दुसरीकडे काळजीवाहू सरकारची पहिली मंत्रीमंडळ उपसिमितीची बैठक सुरु आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी सुरु असलेल्या या बैठकीला शिवसेनेच्या नेत्यांनी मात्र दांडी मारली आहे. अवकाळी पाऊस, खरिप हंगामावर या बैठकीत चर्चा होणार आहे.