मुंबई : शिवसेना कुठल्या जनता पक्षाला बांधिल नसून जनतेला बांधिल आहे असं सांगत अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरणारच असं युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाढत्या महागाईविरोधात शिवसेनेने मुंबईत 12 ठिकाणी मोर्चा आणि रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मातोश्री ज्या ठिकाणी आहे त्या वांद्रे परिसरातील म्हाडा कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि शिवसेनेचे प्रमुख नेते सहभागी झाले होते. यावेळी शिवसैनिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


यावेळी शिवसेनेच्या आंदोलकांनी सरकारवर जोरदार टीका केली. सत्तेत सहभागी असूनही सरकारच्या धोरणाविरोधात आंदोलन केलं जातं असल्यामुळं शिवसेना केंद्र आणि राज्यातल्या सत्तेतून कधी बाहेर पडणार हा प्रश्न पुन्हा उपस्थित केला जाणं स्वाभाविक आहे.


चेंबूर, करीरोडमध्ये सेनेंच आंदोलन


चेंबूरमध्येही शिवसेनेच्या वतीने महागाईविरोधात आंदोलन करण्यात आलंय. आमदार मंगेश सातमकर यांच्या नेतृत्वात यावेळी रास्ता रोको सकरण्यात आला. यावेळी इंधन दरवाढ आणि गॅस दरवाढीचा निषेध करण्यात आला. शिवसेनाही सामान्य माणसासाठी असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दस-याला मोठा निर्णय घेणार असल्याचं यावेळी प्रत्येक नेत्यानं आपल्या भाषणात सांगितलं. यावेळी भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.


चेबूंसह करीरोड इथंही वाढत्या महागाईविरोधात शिवसेनेकडून आंदोलन करण्यात येतंय. या आंदोलनात शिवसेनेच्या नेत्या निलम गो-हे, माजी महापौर स्नेहल आंबेकर आणि आशीष चेंबूरकर सहभागी झाले होते. या आंदोलनात शिवसैनिकही मोठ्या संख्येने सहभागी झालेत. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनकर्त्या निलम गो-हे, स्नेहल आंबेकर, आशीष चेंबूरकर यांना ताब्यात घेण्यात आलंय.