दीपक भातुसे, मुंबई : युती जाहीर झाल्यानं भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्रिपदावरून वाद निर्माण झालाय.  ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असं सत्तावाटपाचं गणित असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. तर आमदारांच्या संख्याबळावरून मुख्यमंत्रिपद असं कोणतंही गणित नसल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. सत्ता आल्यानंतर जबाबदाऱ्य़ांचं समान वाटप करायचं ठरल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलंय. उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील मुख्यमंत्री कुणाचा याची वेगवेगळी गणितं मांडत असल्यानं हा वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरे यांचा हा दावा खरा मानला तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सत्ता आली तर अडीच - अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचे युतीच्या चर्चेत ठरल्याचे स्पष्ट होते. मात्र दुसरीकडे ज्येष्ठ भाजपनेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मात्र उद्धव यांनी केलेल्या दाव्याच्या विरोधी दावा केला आहे. विधानसभा निवडणुकीत ज्याचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री असं भाजप-शिवसेनेचं सत्तेचं गणित असल्याचं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं.


युती झाल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी झी २४ तासला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत शिवसेना-भाजप युतीच्या सत्तेची गणितं मांडली. निवडून आलेल्या आमदारांच्या संख्येनुसार भाजप शिवसेनेला मंत्रिपदं मिळतील असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. शिवसेनेला सोडलेली तेविसावी जागा अजून निश्चित नाही. त्यामुळं पालघर वाट्याला आली असं शिवसेनेनं समजू नये. असा सूचक इशाराही त्यांनी शिवसेनेला दिला आहे.