मुख्यमंत्री `मातोश्री`वरुन रिकाम्या हाताने माघारी
युतीचा फॉर्म्युला निश्चित करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात `मातोश्री`वर चर्चा झाली.
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. युतीचा फॉर्म्युला निश्चित करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात 'मातोश्री'वर चर्चा झाली. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे देखील मुख्यमंत्र्यांसोबत रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमाराला चर्चेसाठी दाखल झाले. शिवसेनेतर्फे उद्योगमंत्री सुभाष देसाई वाटाघाटींमध्ये सहभागी होते. मात्र सुमारे दीड तासाच्या या बैठकीत युतीबाबत काहीच ठोस निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे देवंद्र फडणवीस यांना मातोश्रीवरुन रिकाम्या हातांनी वर्षावर परतावे लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'मातोश्री'वर
सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी अर्ध्या जागांच्या मागणीवर ठाम आहे. या दोन्ही मागण्या विशेषतः लोकसभेची अर्ध्या जागावाटपाची सेनेची मागणी भाजपाला मान्य होण्याची शक्यता कमी आहे. तसंच मित्रपक्षांचं वाटप संबंधित पक्षानं करावं अशीही मागणी सेनेकडून आल्याचे समजते आहे. शिवसेनेबरोबर युतीचा निर्णय कराच, असा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा आदेश असल्याने मुख्यमंत्री मातोश्रीवर गेले. त्यामुळे गेले काही दिवस पडद्यामागे चर्चा करणारे सेना भाजपचे नेते, पहिल्यांदाच उघडपणे चर्चा करताना बघायला मिळाले. मात्र बैठकीनंतर काहीच घोषणा न झाल्याने युतीचा तिढा कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.