मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घटना घडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'मातोश्री'वर पोहोचले आहेत. शिवसेना - भाजप युतीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री भेट घेणार आहेत. आगामी लोकसभा निवडणूक २०१९ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात भाजपने शिवसेनेपुढे नमते घेतले आहे. भाजपकडून जाहीर करण्यात आले होते की भाजपचा कोणताही केंद्रीय स्तरावरचा नेता शिवसेनेशी चर्चा करण्यासाठी 'मातोश्री'वर जाणार नाही. आगामी निवडणुकीसाठी आता यापुढे जी काही चर्चा होईल ती केवळ प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच करतील. मात्र, आज अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट 'मातोश्री'वर पोहोचलेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात याचीच जोरदार चर्चा आहे.
शिवसेनेने भाजपसोबत सत्तेत असतानाही वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला टार्गेट केले आहे. त्यातच युतीसाठी शिवसेना अडून बसल्याने भाजपने यापुढे सेनेची मनधरणी न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मुख्यमंत्र्यानी पुढाकार घेत उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी मातोश्रीवर पोहोचलेत. काही दिवसांपासून, शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'मध्ये पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्र सरकारला निशाण्यावर घेतले होते. त्यामुळेही भाजपमध्ये नाराजीचे वातावरण होते. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षांमधून जाहीर मंचावर नाही तरी पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडत होत्या आणि घडामोडी ठरवून घडवून आणल्या जात होत्या. मात्र, 'युती'बाबत प्रश्नचिन्ह कायम होते. आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर युतीचे घोडे पुढे जाणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत युती होण्याचे संकेत मिळत आहेत.
भाजपला केंद्रात पंतप्रधान हवा असेल तर महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपद शिवसेनेला हवे, अशी अट टाकत युतीसाठी दबाव वाढविला होता. युती हवी असेल तर केंद्रात तुम्ही मोठे, राज्यात आम्ही ही भूमिका शिवसेनेने मांडली आहे. युतीची चर्चा देवाणघेवाणीतून होत असते, माझे ते माझे आणि तुमचे तेही माझ्या बापाचं अशा भूमिकेतून युतीची चर्चा होत नाही, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे.