मुंबई : लोकसभा निवडणुकीत शिवसेना - भाजप युती झाली असली तरी भिवंडी आणि पालघर मतदार संघात युतीबाबत पेच कायम आहे. या दोन्ही मतदार संघावर शिवसेनेने दावा केलाय. २५ आणि २३ अशी जागा वाटपाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मात्र, भाजपने शिवसेनेसाठी सोडलेला एक मतदार संघ कोणता याबाबत अजूनही दावे प्रतिदावे केले जात आहेत. सध्या भिवंडीचे भाजप खासदार कपिल पाटील यांच्या विरोधात शिवसैनिकांमध्ये प्रचंड आक्रमकता दिसत आहे. जागावाटपात ही जागा भाजपच्या वाट्याला गेली तर आमचा कपिल पाटील यांच्या उमेदवारीला विरोध राहील, अशी भूमिका येथील सेना पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर भाजपाकडून पाटील उमेदवार राहिले तर शिवसैनिक बंडखोरी करतील, असा स्पष्ट इशारा ठाणे जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते सुरेश तथा बाळ्यामामा म्हात्रे यांनी दिला आहे. तसंच अजूनही ही जागा युतीत भाजपला सोडण्यात आली नसल्याचे सूचक वक्तव्य म्हात्रे यांनी केलंय, तसंच आमचा सेना भाजप वाद नसून आमचा कपिल पाटील यांना विरोध असल्याचे ते म्हणाले. तसेच शिवसेने आधी स्वतंत्र लढण्याचे घोषित केले होते. त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांनी तशी तयारी केली होती. मात्र, युतीची घोषणा केल्यानंतर शिवसेना कार्यर्त्यांत संभ्रम निर्माण झाला आहे. कार्यकर्त्यांनी विश्वासात न घेतल्यामुळे कोणाचा प्रचार करायचा यात कार्यकर्त्यांत गोंधळ निर्माण झालाय.


दरम्यान, जालनामध्ये हीच स्थिती आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे कट्टर विरोधक अर्जुन खोतकर नाराज आहेत. रावसाहेब दानवे जालना मतदारसंघातील विद्यमान खासदार आहेत. आता शिवसेना-भाजपची युती झाल्यामुळे दानवे यांनाच पुन्हा जालना मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, गेल्या साडेचार वर्षांमध्ये दानवे यांनी शिवसेनेविरोधात उघडलेल्या मोहीमेमुळे येथील शिवसैनिकांमध्ये त्यांच्याविरोधात प्रचंड रोष आहे. त्यामुळे शिवसेना स्वबळावर लढल्यास अर्जुन खोतकर त्यांच्याविरोधात निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित होते. मात्र, युतीच्या निर्णयामुळे हा पर्याय बंद झाल्याने खोतकर यांची कोंडी झाली झाली आहे. त्यामुळे येथे पेच निर्माण झाला आहे. शिवसेना कार्यकर्त्यांत संभ्रम आहे.