मुंबई : राज्यात युती होणार नाही. शिवसेना स्वतंत्र लढणार असे अनेकवेळा जाहीर सांगण्यात येत होते. नाही नाही म्हणत शिवसेना आणि भाजप अखेर युती झाली. ही युती लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी झाली आहे. त्यामुळे राज्याती युती म्हणून दोन्ही पक्ष निवडणूक लढविणार आहेत. मात्र, अद्याप दोन्ही पक्षातून दावेप्रतिदावे करण्यात येत आहेत. यापार्श्वभूमीवर शिवसेना आमदारांबरोबर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे बैठक घेणार आहेत. आमदारांसोबत उद्धव चर्चा करणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ही बैठक होणार आहे. त्यामुळे उद्धव आपल्या आमदारांना काय सल्ला देणार याची जास्त उत्सुकता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, युती झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये वाद क्षमण्याचे नाव घेत नाही. शिवसेना-भाजपाच्या युतीची घोषणा होऊन दोन दिवसही उलटले नाहीत तोच युतीमध्ये भांडण सुरू झाले आहे. भांडणाचा मुद्दा आहे कोण होणार मुख्यमंत्री? महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ज्याचा एक जरी आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री असे जाहीर केल्यानंतर वादाची ठिणगी पडली. शिवसेनेने लगेच प्रत्युत्तर दिले. अडीच अडीच वर्ष प्रस्ताव मान्य नसेल तर युती तोडा.


भाजपचे मुख्यमंत्रिपदाचं हे सूत्र शिवसेनेने तात्काळ फेटाळून लावले आहे. शिवसैनिकांची समजूत घालताना उद्धव ठाकरे यांनी हे स्पष्ट केले. दोन्ही पक्षांचे नेते समसमान पदांबद्दल बोलले, पण मुख्यमंत्रिपदाचा उल्लेखही या संयुक्त पत्रकार परिषदेत झाला नाही. उद्धव ठाकरे स्पष्ट सांगतात की ज्याच्या जास्त जागा निवडून येतील त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र आपण मान्य केलेले नाही. जबाबदारीचे समान वाटप हे सूत्र ठरले आहे. उद्धव यांच्या या दाव्यानुसार मुख्यमंत्रीपदाचं अडीच-अडीच वर्ष वाटप ठरल्याचे स्पष्ट होते आहे.


युती झाल्याच्या काही तासांतच जळगाव आम्हाला द्या म्हणत गुलाबराव पाटलांनी तर जालन्यातून मीच लढणार म्हणत अर्जुन खोतकरांनी निषेधाचे बाण सोडायला सुरुवात केली होती. आता ४८ तासांतच थेट युती तोडण्याचीच भाषा सुरू झाली आहे. हा तर फक्त ट्रेलर आहे....  


ठळकबाबी :


- अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी शिवसेना आमदारांची मातोश्रीवर बैठक आणि चहापान
- उद्धव ठाकरेंनी सर्व आमदारांना बोलवले चर्चेसाठी
- अधिवेशनात आतापर्यंत सरकारविरोधात भूमिका मांडणा-या शिवसेना आमदारांबरोबर उद्धव ठाकरे करणार चर्चा
- अधिवेशनात काय भूमिका घ्यावी याविषयी बैठकीत उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन