शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र राहावी हे बाळासाहेबांचे स्वप्न - रामदास आठवले
शिवसेनेने पुन्हा भाजप सोबत यावे, आठवलेंचं आवाहन
मुंबई : केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांनी आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला भेट घेऊन त्यांना अभिवादन केलं. यावेळी त्यांनी शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येण्यासाठी बाळासाहेबांनी केलेल्या प्रयत्नांबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांना आवाहन देखील केलं.
रामदास आठवले यांनी म्हटलं की, २०१२ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रयत्नांमुळे शिवशक्ती- भीमशक्ती एकत्र आली होती आणि नंतर सत्तांतर झाले होते. आता परिस्थिती बदलली आहे. शिवशक्ती भीमशक्ती एकत्र राहावी असे बाळासाहेबांचे स्वप्न होते, याचा विचार उद्धव ठाकरे यांनी करावा. ज्यांच्या पाठिंब्यावर ते मुख्यमंत्री झालेत, हे बाळासाहेबांनाही आवडले नसते.
'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या त्यांच्या स्वप्नातील शिवशक्तीभीमशक्ती भाजप एकजूट आम्ही साकारली पण नंतरच्या काळात ती एकजूट तुटली याची खंत वाटते.'
भविष्यात पुन्हा ती एकजूट व्हावी हीच शिवसेनाप्रमुखांना खरी आदरांजली ठरेल. शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर आता भाजप-शिवसेना एकत्र येण्यात अडचण नाही. राजकारणात काहीही होऊ शकते. असं ही आठवले यांनी म्हटलं आहे.
पुढे ते म्हणाले की, नितीशकुमार यांना शब्द दिल्यानं त्यांना मुख्यमंत्री केले, तसा शब्द राज्यात भाजपनं शिवसेनेला दिला नव्हता. ६ डिसेंबरला बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर कुणी येवू नये, गर्दी करू नये. कोरोनामुळं सर्वांनी घरीच बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करावे. असं आवाहन देखील त्यांनी यावेळी भिमसैनिकांना केलं आहे.
सर्वधर्मीय प्रार्थना स्थळ राज्य सरकारने सुरू केल्या नंतर केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी चैत्यभूमी,दादर इथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. सर्व धार्मिक स्थळ आता सुरू केली आहेत हे सरकारला उशिरा सुचलेल शहाणपण आहे