मुंबई : आगामी लोकसभा निवडणूक २०१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यात शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं 'युती'चं घोडं अडलंय. आता, शिवसेनेनं भाजपसमोर युतीसाठी एक नवा फॉर्म्युला मांडल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. शिवसेनेनं युतीसाठी भाजपसमोर १९९५ सालच्या जागा वाटपाचं सूत्र मांडलंय. भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या फोननंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा नवा प्रस्ताव मांडल्याचं समजतंय. एव्हढचं नव्हे तर, युती करायची असेल तर आधी विधानसभा जागा वाटपाचं सूत्र निश्चित करण्याचीही अट शिवसेनेनं घातलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात आपणच 'मोठा भाऊ' असल्याचं सांगणाऱ्या शिवसेनेनं युतीसाठी एक पाऊल पुढे टाकलंय... पण, यातही त्यांनी १९९५ सालच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याची अट ठेवत भाजपला पेचात टाकलंय.  


काय होता १९९५ सालचा 'युती'चा फॉर्म्युला?


लोकसभा निवडणुकीत युती करायची असेल तर आधी विधानसभेचं जागा वाटपाचं सूत्र निश्चित करा, अशी कठोर भूमिका घेत शिवसेनेने युतीसाठी भाजपासमोर १९९५ सालचा विधानसभा जागावाटपाचा फॉर्म्युला ठेवला आहे. उल्लेखनीय म्हणजे, १९९५ साली विधानसभेच्या २८८ जागांपैकी शिवसेनेनं १६९ तर भाजपानं ११६ जागा लढवल्या होत्या.


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी युतीसाठी उद्धव ठाकरेंना फोनवर गळ घातल्यानंतर शिवसेनेने लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी आता ही नवीन अट समोर ठेवली आहे.