सरकारने इम्तियाज जलील यांच्याविरोधात फतवा काढावा- शिवसेना
एरवी शासकीय सोहळ्याचे आमंत्रण मिळाले नाहीतर हे लोक थैमान घालतात.
मुंबई: मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहणारे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. स्वातंत्र्य सेनानींचा अपमान करणाऱ्या इम्तियाज जलील यांच्याविरोधात सरकारने फतवाच काढावा. त्यांना यापुढे कोणत्याही शासकीय सोहळ्यास बोलावले जाऊ नये, अशी मागणी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून करण्यात आली आहे.
इम्तियाज जलील वारंवार तोच गुन्हा करत आहेत. ज्यास कायद्याचा भाषेत देशद्रोह म्हटले जाते. स्वातंत्र्यलढा आणि स्वातंत्र्य सेनानी याबाबत जलील यांच्या मनात द्वेष असल्यासारखे ते वागत आहेत. गेल्या साडेचार वर्षात आमदार असताना त्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम सोहळ्याकडे पाठ फिरवली. आता खासदार झाल्यावरही त्यांनी पुन्हा तेच शेण खाल्ले आहे, असे अग्रलेखात म्हटले आहे.
तसेच एरवी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील शासकीय सोहळ्याचे आमंत्रण मिळाले नाही किंवा त्यांच्या मगदुराप्रमाणे बसण्याची 'आम' किंवा 'खास' व्यवस्था झाली नाही तर हे लोक थैमान घालतात. मात्र, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन सोहळ्याचे आमंत्रण असतानाही जलील त्याठिकाणी हजर राहत नाहीत, याकडे शिवसेनेने लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
नुकत्याच साजऱ्या झालेल्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात खासदार इम्तियाज जलील यांनी नेहमीप्रमाणे दांडी मारली होती. आमदार झाल्यापासून गेल्या पाच वर्षात इम्तियाज जलील यांनी कोणत्या ना कोणत्या कारणाने मुक्तीसंग्राम दिनाला येणे टाळले होते.
या पार्श्वभूमीवर अनेकांनी इम्तियाज जलील यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. एमआयएम , हैद्राबाद, ओवेसी आणि रझाकार यांचा संबंध असल्यानेच जलील येण्यास टाळाटाळ करतात का, असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.
यावर इम्तियाज जलील यांनीही फेसबुकवर पोस्ट टाकत स्पष्टीकरण दिले होते. माझ्या उपस्थिती अथवा अनुपस्थितीवरून कुणी माझ्या देशभक्तीची तुलना करू नये. असे विचार डोक्यात येणे यातून संबंधिताची मानसिकता लक्षात येते. देशभक्तीचे प्रमाणपत्र मला अशा मानसिकतेच्या लोकांकडून घेण्याची गरज नाही, असे त्यांनी म्हटले होते.