मुंबई : आमदार प्रशांत परिचारक यांचे विधिमंडळातील निलंबन रद्द करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला याबाबत शिवसेनेने तीव्र संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, या संतपासोबतच राज्यातील शेतकऱ्यांच्या स्थितीबाबतही शिवसेनेने सरकारवर टीकेचे बाण मारले आहेत.


राष्ट्रभक्तीच्या घोषणांचा फुगा फुटत आहे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दै. सामनामध्ये लिहिलेल्या लेखात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हे टीकास्त्र सोडले आहे. '‘जय जवान जय किसान’ या घोषणेचे भाजप राज्यात मातेरे होईल असे कधीच वाटले नव्हते, पण दुर्दैवाने ते झाले आहे. राष्ट्रभक्तीच्या घोषणांचा फुगा रोज फुटत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा सदैव चिंतेचा विषय आहे. अभिनेत्री श्रीदेवीप्रमाणे शेतकऱ्यांना शासकीय इतमामात मानवंदना द्यायची म्हटली तर महाराष्ट्र सरकारच्या बंदुकांतील ‘काडतुसे’ संपून जातील', असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.


ते सर्व लोक नगरच्या ‘छिंदम’अवलादीचेच


दरम्यान, प्रशांत परिचारक यांचे निलंबन मागे घेण्याच्या ठरावाबाबत संताप व्यक्त करताना ठाकरे यांनी म्हटले आहे की,‘'जय जवान’ या आपल्या प्रिय घोषणेचे ‘बारा’ वाजवून भाजप सरकारने आमदार प्रशांत परिचारक यांना विधिमंडळात जणू पायघड्य़ाच घातल्या आहेत. प्रशांत परिचारक यांचे विधिमंडळातील निलंबन रद्द करण्याचा ठराव ज्यांनी मंजूर केला व ज्यांनी त्या ठरावास मूक संमती दिली ते सर्व लोक नगरच्या ‘छिंदम’ अवलादीचेच म्हणावे लागतील. कदाचित सभागृहातील काही सन्माननीय सदस्यांना हा शब्दप्रयोग आवडणार नाही, पण आम्ही विधिमंडळाची माफी मागून हा शब्द वापरत आहोत. कारण ज्यावेळी परिचारक यांच्याविरोधात निंदाजनक ठराव आला होता त्यावेळी त्याला सर्वांनी एकमुखी पाठिंबा दिला होता. आताही परिचारक यांचे निलंबन मागे घेण्याच्या निर्णयाला सगळ्य़ा आमदारांनी तसाच एकमुखी विरोध करायला हवा होता', असे मतही ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.