मुंबई : काळजीवाहू सरकारची पहिली मंत्रीमंडळ उपसिमितीची बैठक सुरु आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ही बैठक सुरु आहे.  उपसमितीच्या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह ज्येठ मंत्री उपस्थितीत आहे. अवकाळी पाऊस, खरिप हंगामावर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलवली आहे. पण या बैठकीला शिवसेनेचे मंत्री गैरहजर आहेत. एकनाथ शिंदे हे औरंगाबादला आहेत. मुख्य़मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या या बैठकीला शिवसेना दूर राहिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात सत्ता स्थापनेवरुन शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या चांगलाच संघर्ष पाहायला मिळत आहे. सत्तेत ५०-५० टक्के वाटा मिळावा म्हणून शिवसेना आग्रही आहे. शिवाय अडीच वर्ष मुख्य़मत्रिपदासाठी देखील शिवसैनिकांकडून दावा केला जात आहे. भाजपने दिलेला शब्द पाळावा अशी शिवसेना नेत्यांची भूमिका आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी अमित शहा, मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यात बंद दारामागे चर्चा झाली होती. त्यानंतर युतीची घोषणा करण्यात आली. पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत असल्याने शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदावर दावा केला जात आहे.


बंद खोलीत झालेल्या बैठकीत काय ठरलं हे उद्धव ठाकरे, अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिवाय कोणालाच माहित नाही. त्यामुळे सगळेच नेते संभ्रमात आहे. आता शिवसेनेसोबत चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांनी तयारी दाखवली आहे. पण आता उद्धव ठाकरे याला कसा प्रतिसाद देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.