शिवसेनेचे `दूत` नाराज काँग्रेसच्या भेटीला, बाळासाहेब थोरातांबरोबर चर्चा
महाविकासआघाडी सरकारमध्ये योग्य स्थान मिळत नसल्याची उघड नाराजी काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली.
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : महाविकासआघाडी सरकारमध्ये योग्य स्थान मिळत नसल्याची उघड नाराजी काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली. यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेटण्यासाठी वेळही मागितली, पण ही भेट अजून झालेली नाही. मुख्यमंत्र्यांच्या भेटीआधी शिवसेनेचे दूत अनिल देसाई यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली.
काँग्रेसचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी अनिल देसाई बाळासाहेब थोरातांना भेटले. लवकरच मुख्यमंत्री काँग्रेस नेत्यांना भेटीसाठी वेळ देणार आहेत. मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन अनिल देसाई यांनी थोरातांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. हे सरकार चांगल्या रितीने सुरू आहे. तिन्ही पक्ष चांगलं सरकार चालवत आहेत. लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा होईल, अशी प्रतिक्रिया अनिल देसाई यांनी बाळासाहेब थोरात यांना भेटून दिली.
'आमच्या काही प्रश्नांबाबत माहिती घेण्यासाठी अनिल देसाई आले होते. मुख्यमंत्र्यांच्या घरात दु:खद घटना झाल्यामुळे दोन दिवस भेट झाली नाही. लवकरच भेट होईल,' अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
महाविकासआघाडीमध्ये निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतलं जात नसल्याचा आक्षेप काँग्रेसच्या नेत्यांना आहे. अशोक चव्हाण यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्येही यावर भाष्य केलं. मागच्या आठवड्यात काँग्रेसच्या मंत्र्यांच्या यावरून बैठकही पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन काँग्रेसची तक्रार मांडण्याचा निर्णय घेण्यात आला.
'खाट कितीही कुरकुरली तरी कोणी चिंता करु नये'
काँग्रेसच्या या नाराजीवर रविवारी सामनामधूनही जुनी खाट कुरकुरते, असं म्हणत निशाणा साधण्यात आला. सामनाच्या या लेखावर बाळासाहेब थोरात यांनी टीका केली. 'सामनामध्ये अपूर्ण माहितीच्या आधारावर गोष्टी लिहिण्यात आल्या आहेत. खाट का कुरकुरते आहे? हे तरी जाणून घ्या. आम्हाला भेटून संपूर्ण माहिती जाणून घ्या आणि मग पुन्हा अग्रलेख लिहा', असं बाळासाहेब थोरात म्हणाले.