कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई: वांद्र्यातील घटना सातत्याने चर्चेत ठेवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.  यापूर्वी लॉकडाऊनच्या काळात सुरतमध्ये जाळपोळीसारखा भयंकर प्रकार घडला. मात्र, त्यावर विरोधकांनी तोंडातून चकार शब्द काढला नाही. तेव्हा कोणीही गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला नाही. परंतु, वांद्र्यातील घटना सातत्याने चर्चेत ठेवली जात आहे. हे सर्व ठरवून सुरु असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वांद्य्रातील घटनेनंतर उलट राज्याने रेल्वे मंत्रालयावर गुन्हा दाखल केला पाहिजे. रेल्वे मंत्रालयाकडून पत्रक काढण्यात आले. मात्र, त्यांनी गाड्या सोडल्या नाहीत. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन गर्दी जमली. हे सर्व ठरवून केले जात असल्याचा दावा राऊत यांनी केला.


आदित्य हे उद्धव ठाकरेंच्या विरोधात भूमिका घेऊच कशी शकतात; आठवलेंचा सवाल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या संकटात चांगले काम करतायत याचे अनेकांना दु:ख होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटाचा फायदा घेऊन राज्यात संभ्रम निर्माण करायचा आणि लोकांमध्ये उद्रेक घडवून हे राज्य अस्थिर व खिळखिळे करण्याचा प्रयत्न सुरु आहे. संकटाच्या काळातही विरोधकांनी एकत्र येऊन काम करण्याऐवजी राजकीय लाभासाठी वेगळी चूल मांडली आहे. मात्र, त्यांना याचा लाभ मिळणार नाही. त्यांचे बाप, आजी-आजोबा अशा १०० पिढ्या उतरल्या तरी उद्धव रिजाईन ही संकल्पना वास्तवात येणार नाही. उलट विरोधी पक्ष जे करतोय त्यांना कायमचं घरी बसावं लागेल. कुणी कितीही आपटू द्या, काही फरक पडणार नाही. सरकार मजबूत आहे व नेतृत्व खंबीर आहे, असे राऊत यांनी ठणकावून सांगितले.