भाजप नेत्यांच्या संपत्ती वैध आहेत का? संजय राऊतांचा सवाल
...आणि त्यांनी भाजपला धारेवर धरलं.
मुंबई : तब्बल 100 कोटींहून अधिक गैर-पारदर्शक व्यवहार केल्याप्रकरणी ईडीकडून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली. सोमवारी रात्री उशिरा अनिल देशमुख यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. जवळपास बारा तासांहून अधिक काळ माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ईडी कार्यालयात चौकशी सुरूच होती.
अनिल देशमुख यांना अटक करण्यात आल्यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळातून नेतेमंडळींच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनीही मंगळवारी पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधताना या प्रकरणावर त्यांची प्रतिक्रिया मांडत भाजपला धारेवर धरलं.
हे राजकारण नाही तर निव्वळ सूडाच्या भावनेनं सध्याच्या घडामोडी घडत असल्याचं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं. अनिल देशमुखांनंतर आता अनिल परब यांचा नंबर असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. यावर उत्तर देताना 2024 नंतर आम्हीही यादी करू, आम्हीही तयारी करू असा इशारा त्यांनी दिला.
लोकशाहीत राजकारणाचा संघर्ष असतोच. पण, केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन विरोधी पक्षांमार्फत महाविकासआघाडी सरकारमधील नेत्यांच्या चौकशीचं सत्र सुरु करण्यात येणं ही बाब चुकीची आहे, याची परतफेड करावीच लागेल असं सूचक वक्तव्य राऊतांनी केलं.
विजय मल्ल्या, मेहुल चोक्सी यांना तुम्ही आणलं नाही, पण आता परमबीर सिंह यांना तरी परत आणा असं म्हणत त्यांनी विरोधी पक्षांना आव्हान दिलं. भाजपचे लोक जंगलात राहतात का, त्यांच्या संपत्ती वैध आहेत का? असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले. राऊत यांच्या बोलण्यातून भाजपच्या राजकारणाची खेळी त्यांच्यावरच उलटेल असा इशारावजा सूर होता.