मुंबई - भाजपकडून अद्याप युतीसंदर्भात कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. त्याचबरोबर महाराष्ट्रात शिवसेना स्वतःच्या अटी आणि शर्तींवर राजकारण करते, असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी स्पष्ट केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी शिवसेनेच्या खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला पक्षाचे सर्व खासदार उपस्थित होते. या बैठकीनंतर संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजप यांची युती होणार का, हा राज्यातील महत्त्वाचा प्रश्न बनला आहे. आगामी लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना हे दोन्ही पक्ष युतीने लढणार की स्वतंत्रपणे लढणार यावर राज्यातील अनेक गणिते अवलंबून आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर सोमवारी शिवसेनेच्या खासदारांची बैठक झाली.


शिवसेनेशी युतीसंदर्भात बैठक सुरू असल्याचे राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. पण शिवसेनेकडून त्याला कोणताही दुजोरा देण्यात आला नाही. त्यातच आता संजय राऊत यांनी युतीसंदर्भात आमच्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नसल्याचे सांगितल्यामुळे युतीचा मुद्दा अद्याप अनिर्णित असल्याचे स्पष्ट झाले आहे. संजय राऊत म्हणाले, युती संदर्भात आमची भूमिका एकदम स्पष्ट आहे. शिवसेना स्वतःच्या अटी आणि शर्तींवर राजकारण करते. महाराष्ट्रात आम्हीच मोठे भाऊ आहोत आणि पुढील काळातही राहणार आहोत. गेल्या २५ वर्षांपासून आम्ही मोठ्या भावाची भूमिका निभावत आहोत. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कायम निधड्या छातीने राजकारण करत आले आहेत आणि तेच पुढेही कायम राहिल. भाजपकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. आणि कोणताही प्रस्ताव आम्ही स्वीकारलेलाही नाही. युतीसाठी ५०-५० टक्के जागावाटपाचे सूत्र ठरल्याचा दावाही त्यांनी स्पष्टपणे फेटाळून लावला.