मी कोणाच्या बापाला घाबरत नाही - संजय राऊत
फोन टॅपिंग प्रकरणी संजय राऊत यांची प्रतिक्रिया...
मुंबई : विधानसभा निवडणूक २०१९ काळात तत्कालीन सरकारकडून फोन टॅप करण्यात आले. तत्कालीन सरकारकडून विरोधकांवर पाळत ठेवायची, बोलणी ऐकायची हे एक प्रकारचं षडयंत्र आहे. निवडणूकीपूर्वी एखाद्याला भीती वाटली असेल, भीतीतून हे झालं आहे. फोन टॅप होण्याचं समजूनही मी माझा फोन बदलला नाही, माझा फोन नंबरही बदलला नाही. मी याला अधिक गंभीरतेने घेत नाही. कोणी काहीही करु दे मी कोणाच्या बापाला घाबरत नाही अशी प्रतिक्रिया, फोन टॅपिंग प्रकरणी बोलताना संजय राऊत यांनी दिली आहे.
तुमचा फोन टॅप होत आहे, अशी माहिती भाजपच्या एका वरिष्ठ मंत्र्यानेच मला दिली असल्याचं संजय राऊत यांनी ट्विट करुन सांगितलं. माझं बोलणं कोणाला ऐकायचं असेल तर त्यांचं स्वागत आहे, मी बाळासाहेब ठाकरेंचा चेला आहे, कोणतंही काम लपून-छपून करत नाही, असं ट्विट त्यांनी केलंय.
विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र सरकारचे काही अधिकारी इस्रायलला गेले होते. त्यांनी तिथून आणलेल्या सॉफ्टवेअरचा वापर करून विरोधकांचे फोन टॅप केल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
फडणवीस सरकारच्या काळातल्या फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. गृहमंत्री अनिल देशमुखांच्या आदेशानंतर ही चौकशी सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांसह अनेक नेत्यांचे फोन टॅप होत असल्याचे आरोप करण्यात आले होते. त्यानंतर आता या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली. अनेक नेत्यांवर पाळतही ठेवण्यात येत असल्याच्या तक्रारीही फडणवीस सरकारच्या काळात विरोधी नेत्यांनी केल्या होत्या. त्याचीही दखल घेण्यात आली आहे.
दरम्यान, अशा प्रकारे फोन टॅप करणं ही विकृत बुद्धी असल्याची टिका गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.