मुंबई : भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गटाने दावा केल्यानुसार भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना 164 मते मिळाली. महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांना 106 मते मिळाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर 2 दिवसांचं विधानसभेचं विशेष अधिवेशन (Maharashtra Assembly Session) बोलवण्यात आलं होतं. ज्यामध्ये विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येणार होती. तर उद्या शिंदे सरकारला बहुमत सिद्ध करायचे आहे.


गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या बाहेर असलेले बंडखोर आमदार विधानसभेच्या अधिवेशनासाठी काल रात्री गोव्यातून मुंबईत दाखल झाले होते. त्यानंतर आज सकाळी फेटे घालून त्यांनी विधानभवनात प्रवेश केला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 


दुसरीकडे प्रेक्षक गॅलरीने देखील सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. कारण शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेना नेते अनिल देसाई आणि अनिल परब, अरविंद सावंत, विनायक राऊत आणि सचिन अहिर उपस्थित होते. शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर जवळपास 39 आमदार आज मुंबईत दाखल झाले होते. त्यांच्यावर सभागृहात या नेत्यांचा वॉच होता का अशी चर्चा सुरु झाली आहे.


शिवसेनेचे 39 आमदार शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर शिवसेनेकडून आता डॅमेज कंट्रोल सुरु आहे. शिवसेना वाचवण्यासाठी बैठकांवर बैठका होत आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे कामाला लागले आहेत.