देवेंद्र फडवणीस यांना शिवसेनेचा `सामना`तून जोरदार टोला
कोरोनाचे संकटात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे, अशी सातत्याने विरोधी पक्ष भाजपकडून टीका होत आहे.
मुंबई : कोरोनाचे संकटात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे, अशी सातत्याने विरोधी पक्ष भाजपकडून टीका होत आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही महाविकास आघाडी सरकारविरोधात टीकाचा सूर लावला आहे. मात्र, त्याचवेळी 'गिरीश, मला करोना झाला तर खासगी रुग्णालयात भरती करु नका. मुंबईत सरकारी रुग्णालयातच भरती करा,' अशी भावना फडणवीसांनी व्यक्त केली होती. हाच धागा पकडत शिवसेने त्यांना 'सामना'तून जोरदार टोला लगावला आहे. त्याचवेळी त्यांचे कौतुकही केले आहे. फडणवीस समाधानी! आणखी काय हवे, असे म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर अखेर शिवसेनेचं मुखपत्रे असलेल्या दैनिक 'सामना'तून कौतुक करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर त्यांना जोरदार चिमटेही काढण्यात आले आहेत. राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर विरोधी पक्षनेते समाधानी आहेत. तशा त्यांच्या भावना त्यांनी मोकळेपणाने व्यक्त केल्या. राज्याच्या आरोग्य यंत्रणेला आणखी काय हवे, असे सांगतानाच फडणवीसांना कोरोना वगैरे होऊ नये. त्यांना उदंड, निरोगी दीर्घायुष्य लाभोच, त्यांचे बाल-बच्चे व राजकीय बगलबच्चेही सुखात राहोत, ही आमच्यासारख्यांची ईश्वरचरणी प्रार्थना आहे, असा टोला शिवसेनेने लगावला आहे.
फडणवीस यांनी गिरीश महाजन यांना फोन केला होता. 'गिरीश, मला करोना झाला तर खासगी रुग्णालयात भरती करु नका. मुंबईत सरकारी रुग्णालयातच भरती करा, अशी भावना फडणवीस यांनी व्यक्त केली होती. विरोधी पक्षनेत्यांनी राज्यातील डॉक्टर, परिचारिका यांच्यावर विश्वास व्यक्त केला. आपल्याला काही झाले तरी हीच सरकारी यंत्रणा सुखरूप ठेवेल हा त्यांचा आत्मविश्वास सरकारला आणि हजारो करोनाग्रस्तांना बळ देणारा आहे. त्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक तरी किती करावे? नव्हे, ते करायलाच हवे, असे शिवसेनेने म्हटले आहे.
विरोधी पक्षनेते फडणवीस हे आजही तितकेच तरुण, तडफदार वगैरे आहेत, जितके ते मुख्यमंत्रीपदावर असताना होते. फडणवीस यांचे एक भावनिक आणि हृदयस्पर्शी वक्तव्य समोर आले आहे. फडणवीस यांचे नेहमीचेच टुमणे असते की, ‘सामना’तून कधी आपल्या पाठीवर कौतुकाची थाप पडत नाही. त्यांचे हे म्हणणे म्हणजे अर्धसत्य आहे. फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी असताना ‘सामना’ वाचत नव्हते असा दावा त्यांनी केला. त्यामुळे त्यांच्यावर केलेले कौतुकाचे क्षण वाचनातून निसटले असावेत. ‘वाचाल तर वाचाल’ असा एक मंत्र आहे. त्यामुळे ‘सामना’ सोडून फडणवीस इतर काही वाचत असावेत व त्यामुळेच आता विरोधी पक्षनेते म्हणून त्यांना नियमित ‘सामना’ वाचावा लागतो. फडणवीस हे विरोधी पक्षनेते म्हणून उत्तम काम करीत आहेत असे आम्ही याच स्तंभात अनेकदा सांगितले. ही कौतुकाची थाप नाही काय? ही तर सगळ्यात मोठी शाबासकी आहे.
राज्यातील आरोग्य यंत्रणेवर फडणवीस हे संपूर्ण समाधानी आहेत व उद्या आपल्याला करोना झालाच तर कोणत्याही खासगी इस्पितळात न पाठवता सरकारी इस्पितळातच दाखल करावे असे ‘विल’ म्हणजे इच्छापत्र त्यांनी गिरीश महाजनांवर सोपवले. काहींना यातही फडणवीस यांचा ‘स्टंट’ वाटतो आहे. मात्र त्यांनी त्यांच्या सहज भावना व्यक्त केल्या आहेत. त्याला स्टंट वगैरे म्हणणे योग्य नाही. किंबहुना, या त्यांच्या भावनांचे कौतुक करावेच लागेल व समस्त महाराष्ट्रीय जनतेने त्यांची पाठ थोपटावी असा हा प्रसंग आहे. फडणवीस हे काल राज्यकर्ते होते. त्यामुळे सरकारी यंत्रणा काय होती, काय आहे याचे भान त्यांना आहे, असा टोलाही शिवसेनेने लगावला आहे.