मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट (Shinde vs Thackeray) असा संघर्ष पाहायला मिळत आहे. यातच शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. या भेटीवरुन उद्धव ठाकरेंवर राहुल शेवाळे यांनी हे गंभीर आरोप केले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरे यांनी मेव्हण्याला वाचविण्यासाठी दिल्लीला चकरा मारल्या. मेव्हण्याला वाचविण्यासाठी पंतप्रधानांची भेट घेतली होती. असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. उद्धव ठाकरे दिल्लीला का येत होते हे त्यांनी सांगावं असं देखील त्यांनी म्हटलं आहे.


राहुल शेवाळे यांच्या उद्धव ठाकरेंवर या गंभीर आरोपानंतर एकच खळबळ उडाली आहे. त्यावर आता उद्धव ठाकरे काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवसेनेवर दावा केल्यानंतर आता शिंदे गट दसरा मेळावा घेण्याबाबतही तयारी करत आहे. कालच काही ठिकाणी शाखेवरुन देखील शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा पाहायला मिळाला होता.


शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्या या आरोपावर आता काय राजकीय प्रतिक्रिया उमटतात हे देखील पाहावं लागेल. 


श्रीधर पाटणकर (Shridhar patankar) हे उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे आहेत. ते व्यवसायाने बिल्डर आहेत. श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तेवर ईडीने काही दिवसांपूर्वी कारवाई केली होती. ज्यामध्ये त्यांचे 11 फ्लॅट जप्त केले होते. ठाण्यातील साईबाबा गृहनिर्मिती प्रकल्प हा पाटणकर व अन्य दोघांचा असून या प्रकल्पाला 30 कोटी नंदकिशोर चतुर्वेदी यांनी दिले असून हा आर्थिक व्यवहार शेल कंपन्यांच्या माध्यमातून झाल्याचे ईडीचा आरोप होता. या पैशातून पाटणकरांनी 11 फ्लॅट घेतल्याचा देखील आरोप होता.