Maharashtra Politics : गल्लीपाठापोठ आता दिल्लीतही शिवसेनेत (Shivsena) बंडाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 40 आमदारांपाठोपाठ आता शिवसेनेचे काही खासदारही स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय. शिवसेनेतल्या या संभाव्य बंडाची कुणकुण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लागली.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांनी सोमवारी मातोश्रीवर खासदारांची तातडीची बैठक बोलावली.  मात्र 19 पैकी तब्बल 7 खासदारांनी बैठकीला दांडी मारल्यानं शिवसेनेला आणखी एक धक्का बसलाय. जे खासदार नॉट रिचेबल आहेत, त्यामध्ये श्रीकांत शिंदे, भावना गवळी, कृपाल तुमाने, संजय मंडलिक, संजय जाधव, हेमंत पाटील आणि कलाबेन डेलकर यांचा समावेश आहे.


हे खासदार नाराज असल्याचं बोललं जातंय. लोकसभेत वेगळा गट म्हणून मान्यता मिळावी, अशी मागणी शिवसेना खासदार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडं करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय.


हे कमी झालं म्हणून की काय, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कुणाला पाठिंबा द्यायचा यावरून शिवसेना संसदीय पक्षात स्पष्ट फूट पडलीय. सुमारे 15 खासदारांनी भाजप उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी लावून धरली आहे. तर राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हांना पाठिंबा देण्याची ठाम भूमिका मांडली. याबाबतचा अंतिम निर्णय आता उद्धव ठाकरे घेणार आहेत.


धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय, अशी उद्धव ठाकरेंची अवस्था झालीय. बंडखोर शिवसेना आमदार आणि भाजपच्या सूरात सूर मिसळण्याची भूमिका शिवसेना खासदारांनी घेतलीय. त्यामुळं आणखी बॅकफूटवर येण्याची वेळ शिवसेना पक्षप्रमुखांवर आली आहे.