SSR case : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत संजय राऊत म्हणाले...
`कायद्याच्यावर कोणीही नाही...`
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर याबाबत अनेक प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याबाबत बोलताना, आपल्या राज्याची न्याय व्यवस्था नेहमीच देशातील सर्वोत्कृष्ट राहिली आहे. कोणी कितीही मोठा किंवा छोटा व्यक्ती असला तरी कायद्याच्यावर कोणीही नाही, असं म्हटलं आहे.
हे कायद्याचं राज्य आहे. न्याय आणि सत्यासाठी संघर्ष करणारं राज्य आहे. हे कुणावरही अन्याय करणारं राज्य नाही, इथे नेहमीच न्याय आणि सत्याचा विजय होतो, असंही राऊत म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे. या प्रकरणात कायदेशीर कारवाईबाबत, सरकारमध्ये जे जाणकार आहेत किंवा मुंबई पोलीस आयुक्त किंवा महाधिवक्ता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर बोलू शकतात. ही कायदेशीर आणि न्यायालयीन बाब आहे, यावर राजकीय प्रतिक्रिया देणं योग्य नाही, असं राऊत म्हणाले.
मोठी बातमी : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार
मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं, हे एक षडयंत्र आहे. मुंबई पोलिसांना आपल्याच राज्याचे राजकारणी बदनाम करत असतील, तर ते या राज्याचं खच्चीकरण करत आहेत. मुंबई पोलिसांच्या प्रामाणिकपणावर शंका घेणं म्हणजे, ज्या महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले, त्यांनी घटना निर्माण केली, त्यांच्यावर अविश्वास दाखवण्यासारखं आहे, असंही संजय राऊत म्हणाले.