मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई :  दररोज न्यूज चॅनेलवर सकाळी सकाळी पत्रकार परिषद घेणारे शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सध्या भायखळ्याच्या आर्थर रोड कारागृहात (Arthur Road Jail) आहेत. पत्राचाळ घोटाळाप्रकरणी संजय राऊत सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोरेगावच्या पत्राचाळ प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या संजय राऊत यांना ईडीच्या (ED) विशेष न्यायालयाने 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर आज राऊतांना बेल की जेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं मात्र आजही राऊतांना दिलासा मिळालेला नाही. 


आज झालेल्या सुनावणीमध्ये संजय राऊत यांच्या कोठडीमध्ये 14 दिवसांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे संजय राऊत यांचा 5 सप्टेंबरपर्यंत आर्थर रोड तुरूंगातील मुक्काम वाढला आहे. 30 जुलै रोजी राऊतांना ईडीने अटक केली होती. 


आता संजय राऊत तुरुंगात काय करत असतील असा प्रश्न काहींना पडला असेल. संजय राऊत हे पत्रकार असल्याने त्यांना लिखाण आणि वाचनाची आवड आहे. यामुळे वाचन आणि लिखाणात बहुतांश वेळ ते व्यतित करतात. 


संजय राऊत लिहितायत पुस्तक
संजय राऊत हे तुरुंगात दररोज न्यूजपेपर वाचतात. मात्र अधिकृरित्या ते कोणतेही लिखाण करू शकत नाहीत. आज कोर्ट परिसरात 'झी 24 तासा'ने त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा त्यांनी ही सगळी खोटी केस आहे यावर आपण पुस्तक लिहीत असल्याची माहिती दिली. 'सगळी केस खोटी आहे. माझा काही संबंध नाही. प्रवीण राऊत माझे नातेवाईक आहेत. यातील फक्त दोन जणांना मीओळखतो. सच के साथ लढ सकते हैं, झूट के साथ नहीं, या खोट्या केसवर मी आतमध्ये पुस्तक लिहीत आहे" असं विधान संजय राऊत यांनी केलं.


'मी फिट अँड फाईन'
मीडियाने विचारपूस केल्यावर, "मी कसा दिसत आहे ? फिट अँड फाईन" असे तात्काळ उत्तर संजय राऊत यांनी दिलं. 


संजय राऊत कोर्टात वेळेत हजर
दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांची आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी संपली. यामुळे आज त्यांना विशेष PMLA कोर्टात हजर केलं. सकाळी बरोबर 10.15 वाजता संजय राऊत यांना घेऊन पोलीस कोर्ट नंबर 16 बाहेर हजर झाले. मात्र न्यायाधीश एम. जी. देशपांडे कोर्टमध्ये हजर नव्हते. यामुळे कोर्टचे कामकाज सुरू झालं नव्हते. विशेष म्हणजे संजय राऊत यांचे वकील आणि आणि आमदार असलेले भाऊ सुनील राऊत देखील कोर्टात हजर नव्हते. यामुळे संजय राऊत यांछापर थोडा चढला होता.


संजय राऊत यांनी कार्यकर्ते आणि कुटुंबियांशी केली बातचीत
फिक्कट पिवळ्या रंगाचा झब्बा आणि हातात कागदपत्रे घेऊन संजय राऊत कोर्टमध्ये हजर झाले. जवळपास एक तास संजय राऊत यांना कोर्टबाहेर सुनावणीसाठी वाट पाहत उभं राहावं लागलं. तब्बल 20 मिनिटांनी शिवसेनेचे काही कार्यकर्ते कोर्टमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांचे भाऊ सुनील राऊत, दुसरे भाऊ आप्पा राऊत, पत्नी वर्षा राऊत आणि त्यांच्या दोन मुली कोर्टात हजर झाल्या. त्यानंतर संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांशी थोडी बातचीत केली आणि मग त्यांनी आपल्या कुटुंबियांशी बातचीत केली.