मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे कर्नाटकच्या राज्यपालांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. भाजप हा कर्नाटकमधला सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे. पण त्यांना बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. तर काँग्रेस आणि जेडीएसनंही सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. आपल्याकडे एकूण ११७ आमदारांचं पाठबळ असल्याचं काँग्रेस आणि जेडीएसनं सांगितलं आहे. तसंच जेडीएसचे नेते एचडी कुमारस्वामी हे काँग्रेस-जेडीएसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. कर्नाटकमधल्या या राजकीय परिस्थितीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भविष्यवाणी केली आहे. भाजपचं सत्ता टिकवणं आणि विकत घेण्याचं राजकारण पाहाता जेडीएस फुटुही शकते. त्याबाबतीत भाजपचं राजकारण काँग्रेसपेक्षा वरचढ आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस जेडीएस एकत्र आले तर तेही बहुमताच्या जवळ पोचताहेत. त्यांनी सत्ता स्थापनेसाठी दावा केला असेल तर राज्यपालांना निर्णय घेताना फार त्रास होईल. सत्ता स्थापनेचा नैतिक दावा हा भाजपचा असायला हवा कारण आज कर्नाटकमध्ये तो सर्वात मोठा पक्ष आहे, असं राऊत म्हणाले.


मोठ्या पक्षाला सत्ता स्थापनेसाठी बोलावणे ही घटनेनुसार प्रथा आहे. पण गेल्या काही वर्षांत काँग्रेस-भाजपकडून या प्रथा पाळल्याच गेल्या आहेत असं दिसतं नाही. गोवा-मणिपूर मध्ये असे निर्णय घेतले गेले नाहीत. पण कर्नाटकमध्ये परिस्थिती वेगळी आहे. ते मोठं राज्य आहे. त्यामुळे लहान राज्यातले निर्णय वेगळे आणि मोठ्या राज्यातले निर्णय स्थिरतेच्या दृष्टीने म्हत्वाचे असतात. त्यामुळे राज्यपालांसमोर काँग्रेस आणि जेडीयू मिळून आमदार उभे राहिल्यास त्यांच्यासाठी मोठा पेच असेल की सत्ता स्थापन करण्यास कुणाला द्यावी ? सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला की काँग्रेस-जेडीयूला? जर राज्यपाल रामशास्त्री असतील तर ते नक्कीच त्यापद्धतींन निर्णय घेतील, असं राऊत यांना वाटतंय.


जेडीएस किंग मेकर नाही किंग


जनतेनं जेडीएसला किंगमेकर करण्याऐवजी थेट किंगच केलंय. कुमारस्वामी कदाचित मुख्यमंत्रीही होऊ शकतील. लोकशाहीत दुर्दैव की निवडून आलेला मोठा पक्ष विरोधी बाकांवर बसतो आणि छोट्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो, अशी खंत राऊत यांनी व्यक्त केली.


काँग्रेसची धूर्त खेळी


जेडीएसला पाठिंबा देणं ही काँग्रेसची धूर्त खेळी आहे. यापुढच्या २४ तासांमध्ये आणखी खेळी होतील. या खेळीत मोदी-शाह वरचढ ठरतील, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे. काँग्रेस-जेडीएस यांना सरकार स्थापन करू दिलं नाही तर संसदेमध्ये याचे पडसाद उमटतील. संसदेचं कामकाज बरेच दिवस ठप्प होईल, अशी चिंता संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.