मुंबई: नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (Citizenship amendment)देशभरात उग्र निदर्शने सुरु असताना शिवसेनेचे प्रमुख नेते संजय राऊत यांनी एक ट्विट केले आहे. 'सभी का खून है शामिल यहाँ की मिट्टी में| किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है', अशा ओळी राऊतांनी या ट्विटमध्ये लिहल्या आहेत. त्यांच्या या ट्विटचा रोख केंद्र सरकार राबवू पाहत असलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या दिशेने असल्याचा अंदाज आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

CAA विरोधी आंदोलनात सार्वजनिक मालमत्तेची नासधुस करणाऱ्यांच्या मालमत्ता जप्त


महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या नाट्यमय घडामोडींवेळीही संजय राऊत सातत्याने सूचक ट्विटस करून शिवसेनेची भूमिका मांडत होते. त्यामुळे राऊत यांचे हे ट्विट पाहून शिवसेना नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात काही निर्णायक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे का, याविषयी अंदाज बांधले जाऊ लागले आहेत. 



यापूर्वी शिवसेनेने लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या बाजूने मतदान केले होते. मात्र, दोन दिवसांनीच या विधेयकावर राज्यसभेत झालेल्या मतदानावेळी शिवसेना तटस्थ राहिली होती. आपल्या या भूमिकेचे समर्थन करताना शिवसेनेने विधेयकात काही बदल सूचवले होते. त्यानुसार बाहेरच्या देशातील लोकांना नागरिकत्व दिले तरी त्यांना इतक्यात मतदानाचा हक्क देऊ नये. जेणेकरून या माध्यमातून   व्होटबँकेचे राजकारण होणार नाही, असे शिवसेनेने म्हटले होते. मात्र, महाराष्ट्रात काँग्रेसशी आघाडी केल्यामुळे शिवसेनेने आपली भूमिका बदलल्याची टीका भाजपकडून करण्यात आली होती. 


घराबाहेर तिरंगा फडकावून भाजपचा विरोध करा; ओवेसींचे जनतेला आवाहन


दरम्यान, नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात ईशान्य भारतात सुरु झालेल्या आंदोलनाचे लोण आता देशभरात पसरले आहे. दिल्ली आणि उत्तर प्रदेशात या आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केले आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात सुरु असणाऱ्या आंदोलनाबाबत काय बोलणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.