मुंबई: नुकत्याच साजऱ्या झालेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या राजकीय विरोधकांना उपरोधिक शैलीत चिमटे काढले आहेत. काँग्रेसच्या नशीबात राजयोग नसल्यामुळे त्यांना आता शवासनाची गरज असल्याचा टोला शिवसेनेने लगावला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तील अग्रलेखात ही तुफान फटकेबाजी करण्यात आली आहे. या अग्रलेखात शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही मुक्तकंठाने प्रशंसा केलीय. नरेंद्र मोदी यांच्या नशिबात राजयोग आहे. मोदी स्वतः अठरा-अठरा तास काम करतात. याचे सामर्थ्य ते पहाटे उठून करीत असलेल्या ‘योग’ साधनेत आहे. योगात इतकी ताकद आहे की, योग दिवसाच्या पर्वातच मोदी हे जगातील ‘सर्वशक्तिमान नेते’ म्हणून घोषित झाले. ब्रिटिश हेरॉल्ड या मान्यवर मासिकाने जो वाचक कौल घेतला त्यात मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना मागे टाकले, याकडे अग्रलेखातून लक्ष वेधण्यात आले आहे. 


तर राहुल गांधी यांच्यावर टीका करताना संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावेळी घडलेल्या एका प्रसंगाचा दाखला शिवसेनेकडून देण्यात आला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी गुरुवारी सभागृहात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे अभिभाषण सुरू असताना बराच वेळ ‘मोबाईल योग’ करताना दिसले. तोदेखील बहुधा राजयोग नसण्याचाच परिणाम असावा. काँग्रेस पक्षाने त्यावर असा खुलासा केला आहे की, राष्ट्रपतींच्या भाषणातील काही हिंदी शब्दांचा अर्थ राहुल यांना समजला नाही. त्यामुळे ते मोबाईलमध्ये त्या शब्दांचा अर्थ शोधत होते. आता खरे काय हे राहुल आणि त्यांच्या पक्षालाच माहित असावे. पण ‘राजयोग’ नसल्यानेच राहुल यांना हे असे ‘द्राविडी प्राणायाम’ करावे लागत आहेत हे मात्र खरे, असे शिवसेनेने म्हटले आहे.


तसेच विरोधकांकडे पुढील पाच वर्षे बराच वेळ आहे. त्यांनी पाच वर्षे कपालभाती नामक योग करत राहावा. काँग्रेससारख्या पक्षांना सध्या शवासनाची गरज आहे. त्यांचा श्वास जवळजवळ बंदच झाला आहे. पुन्हा अनेक योगासने अशी आहेत की, तंगडे मानेत अडकू शकते किंवा तंगडय़ांत तंगडे अडकू शकते, असे म्हणत शिवसेनेने काँग्रेसची खिल्ली उडविली आहे.