मुंबई : महापालिकेत पहारेकरी भाजपकडून नालेसफाई दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, शिवसेनेकडून आचारसंहितेचे कारण पुढे करण्यात आले आहे. असे असले तरी शिवसेनेवर भाजपकडून कुरघोडी करण्यात आली आहे. युती असताना भाजपने मुंबईवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी धडपड सुरु केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई महानगरपालिकेत सत्ताधारी शिवसेना आचारसंहिता असल्याने चाचपडत असतानाच पहारेकरी भाजपने नालेसफाई दौऱ्याचं आयोजन करुन, शिवसेनेवर कुरघोडी केली. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांताक्रुझ पश्चिम भागातील नाल्यांची पाहणी करत प्रशासनाला लक्ष्य केले. विशेष म्हणजे मित्रपक्ष शिवसेनेला सोबत घेऊन त्यांना हा दौरा करता आला असता परंतु त्यांनी तसे केलेले नाही. निवडणूक आचारसंहिता असल्याने पालिका प्रशासनाचे कुणीच सोबत नसताना केवळ पक्षातील कार्यकर्त्यांना सोबत घेत असा घाईने दौरा करणे, म्हणजे सत्ताधारी शिवसेनेला डिवचण्याचाच हा प्रकार मानला जात आहे. 


मात्र यामध्ये कुठलंही राजकारण नसून केवळ प्रशासनावर वचक निर्माण करत कामं पूर्ण होण्यासाठीच हा दौरा केल्याचं स्पष्टीकरण आशिष शेलार यांनी केलं. प्रशासन नालेसफाईची कामं पूर्ण केल्याचे केवळ आकडे फेकत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच महापौरांच्या आचारसंहिता शिथिल करण्याच्या मागणीलाही त्यांनी पाठिंबा दिला. शिवसेना त्यांच्या पातळीवर दौरे करेल, आम्ही आमच्या पातळीवर दौरे करत असल्याचं त्यांनी सांगितले. 
  
मुंबई महानगरपालिका प्रशासन नालेसफाई होत असल्याचा कागदोपत्री दावा करत असलं तरी वास्तव वेगळंच आहे. सांताक्रूझ पश्चिममधला गझदरबंध नाला कचऱ्यानं पूर्ण व्यापलेला आहे. मुंबईकरांनो यंदाचा पावसाळा तुमची परीक्षा पाहणारा असू शकतो. कारण मुंबईत नालेसफाईच्या कामांना सुरुवातच झालेली नाही. त्यामुळं यंदा मुंबई जलमय होण्याची शक्यता नाकारता येत नाही.